'मविआ'ची बैठक रद्द, आता २७ ला निर्णय? 'वंचित'ला निमंत्रण नाही!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीही जोमाने तयारी करत असतानाच, आता जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची गुरुवारी महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र
'मविआ'ची बैठक रद्द, आता २७ ला निर्णय? 'वंचित'ला निमंत्रण नाही!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीही जोमाने तयारी करत असतानाच, आता जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची गुरुवारी महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी २७ फेब्रुवारीला मुंबईत बैठक बोलावण्यात आली असून त्यात जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला हरवण्याचा चंग ‘मविआ’ने बांधला आहे. त्यादृष्टीने दोन-तीन महिन्यांपासून तयारी सुरू आहे. जागावाटपाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मुंबईत गुरुवारी होणारी बैठक रद्द करून बैठकीची नवी तारीख जाहीर केली आहे. पण, या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवले नसल्याचे कळते.

वास्तविक महाविकास आघाडीत समावेश करावा, यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील होती. अखेर ३० जानेवारी रोजी अधिकृत पत्र काढून वंचितचा महाविकास आघाडीत समावेश केल्याचे तिन्ही पक्षांनी जाहीर केली. त्यानंतर २ फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी काही जागांची मागणी केल्याचे कळते.

आता २७ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना हे तीन पक्ष सहभागी होतील. तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण गेल्यास आणि त्यांनी ते स्वीकारल्यास तेही सहभागी होतील.

logo
marathi.freepressjournal.in