गिरीश चित्रे / मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सोपवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआचा प्रचार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला करावा लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, मविआच्या जागावाटपासाठी आज (शुक्रवारी) षण्मुखानंद हॉलमध्ये राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या नेत्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजयी होण्यासाठी रणनीती आखल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त विशेष रणनीती आखली आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे समजते.
विधानसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीत काढण्यात येणाऱ्या रॅली, प्रचार सभांमध्येसुद्धा काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. काँग्रेस नेत्यांना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी ही माहिती दिल्याचे समजते.
दरम्यान, आज (शुक्रवारी) षण्मुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या मेळाव्यात जागावाटपावर चर्चा होणार असून २० ऑगस्टला राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नवीन जबाबदारीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना याविषयी विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
शिवसेनेचे पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपसह बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर प्रत्येक सभेत टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांची आक्रमक भूमिका लक्षात घेता महायुतीतील नेतेही सावध भूमिका घेत आहेत.
शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांचे मार्गदर्शन
विधानसभा निवडणुकीत विजयाकडे लक्ष केंद्रित करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखली आहे. राज्यात मविआची मोर्चेबांधणी सुरू असून महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आज (शुक्रवारी) सकाळी, ११ वाजता षण्मुखानंद सभागृहात संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार!
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यात आले होते. त्यामुळे ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. मविआचे प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव समोर आले आहे. मात्र मविआच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर अद्याप कोणताही निर्णय नाही. तर निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण, हे ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.