मविआमध्ये रामटेक, मुंबईवरून चुरस? कोल्हापूर, जळगावचा तिढा सुटला

महाविकास आघाडीतही जवळपास १५ जागांवरून मतभेद होते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या जागांवर रस दाखविला होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र,...
मविआमध्ये रामटेक, मुंबईवरून चुरस? कोल्हापूर, जळगावचा तिढा सुटला

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीने निवडणूक समितीच्या माध्यमातून बऱ्यापैकी जागावाटप पूर्ण केले. केवळ १५ जागांवरून तिढा कायम होता. मात्र, टप्प्याटप्प्याने एकत्रित बसून दोन जागा वगळता जवळपास सर्वच जागांचा गुंता सुटला आहे. त्यात कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आणि सांगली मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळाला. यासोबतच जळगावही शिवसेना ठाकरे गटाला मिळाला. मात्र, रामटेक आणि दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून चुरस सुरू आहे. मात्र, बुधवारी महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीत मित्रपक्षांसह सर्वच जागावाटप निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून, मंगळवारी त्यांच्या छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोल्यात बैठका आणि सभा झाल्या. तसेच महायुतीतील जागावाटपावरही चर्चा केली. त्यामुळे महायुतीतील तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीत अनेक जागांवर धुसफूस सुरू असून, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपसमोर तिढा सोडविण्याचे आव्हान आहे. यातून अमित शहा काय मार्ग काढतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सद्यस्थितीत भाजप ३० पेक्षा कमी जागा लढविण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे महायुतीतील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे, महाविकास आघाडीतही जवळपास १५ जागांवरून मतभेद होते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या जागांवर रस दाखविला होता. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, वरिष्ठांशी चर्चा करून यातून मार्ग काढण्याचा शब्द निवडणूक समितीच्या सदस्यांनी दिला होता. त्यावरून मागच्या काही दिवसांत यावर चर्चा झाली आणि यातून बऱ्याच जागांचा तिढा सुटला आहे. त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटानेही दावा केला होता. कारण या मतदारसंघात या तिन्ही पक्षांचीही मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा सोडण्यास कोणीही तयार नव्हते. परंतु अखेर ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. त्या बदल्यात शिवसेनेला सांगलीची जागा देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in