सांगलीवरून मविआत तिढा, वाद काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात; मुंबईत हव्यात २ जागा; भिवंडी, रामटेकवरही काँग्रेसचा दावा

सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेस सांगली मतदारसंघ सोडायला तयार नाही. परंतु...
सांगलीवरून मविआत तिढा, वाद काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात; मुंबईत हव्यात २ जागा; भिवंडी, रामटेकवरही काँग्रेसचा दावा
(संग्रहित छायाचित्र, ANI)
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे काँग्रेस सांगली मतदारसंघ सोडायला तयार नाही. परंतु कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेचा असताना तो काँग्रेससाठी सोडला. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी शिवसेनेची मागणी आहे. परंतु काँग्रेस हे मान्य करायला तयार नाही. त्यावरून वाद सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाने थेट डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. एवढेच नव्हे, तर गुरुवारी रात्री सांगलीत सभा घेऊन पुन्हा एकदा चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, असे ठासून सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत वाद उफाळून आला असून, आता यासंबंधीची तक्रार थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पोहोचली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघासह राज्यातील आणखी काही जागांवर काँग्रेस अडून बसली आहे. परंतु शिवसेना ठाकरे गट त्या जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातच वाद आहे. काँग्रेसला मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई आणि दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवी आहे. या मतदारसंघांतून काँग्रेसचे संजय निरुपम आणि वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यायची आहे. परंतु उत्तर-पश्चिम मुंबईतून ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेना ती जागा सोडायला तयार नाही. तसेच दक्षिण-मध्य मुंबईतही शिवसेनेचाच उमेदवार उभा करायचा आहे. त्यावरून दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने भिवंडी मतदारसंघावर दावा केला आहे. परंतु काँग्रेस भिवंडीचीही जागा सोडायला तयार नाही. तसेच रामटेकवरही काँग्रेस, शिवसेनेचा दावा आहे. यावरून वाद अडला आहे. त्यामुळे यातून मार्ग कसा काढणार, असा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये हा वाद सुटत नसल्याने आता काँग्रेसने थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे या वादावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत सांगलीच्याच जागेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खा. संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे, तर यातून वाद झाल्यानेच मीडियाशी न बोलता संजय राऊत निघून गेल्याचेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जागेवरून तिढा सुरू असताना उद्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले आणि त्यांनी जाहीर सभा घेऊन पुन्हा जाहीरसभेत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे सांगलीत उत्साहाचे वातावरण आहे. परंतु या उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कारण या जागेवरून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. विशेष म्हणजे ही काँग्रेसची पारंपरिक जागा आहे. त्यामुळे काँग्रेस नेते ही जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हा वाद वाढला आहे. यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हा वाद टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच मुंबईतील जागाही शिवसेना सोडायला तयार नाही आणि भिवंडीची जागा राष्ट्रवादीला द्यायला तयार नाहीत. त्यामुळे हा वाद आता थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नेमका काय तोडगा काढते, हे पाहावे लागेल.

मविआत नव्याने चर्चा?

एकीकडे महायुती मनसेला घेऊन महाविकास आघाडीच्या विरोधात मजबुतीने समोर येत आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आता डावे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसोबत नव्याने बोलणी सुरू करण्याचे ठरविले आहे. काहीही करून या दोन्ही पक्षांना सोबत घेणे आवश्यक आहे तरच मजबुतीने लढा देणे शक्य होईल, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्याशी नव्याने बोलणी होऊ शकते. त्यासाठी काही जागांची अदलाबदलीही होऊ शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप आणखी रखडण्याची चिन्हे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in