काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच सुरूच; तोडगा न झाल्याने संजय राऊत बैठकीतून निघून गेले

सांगली आणि मुंबईतील लोकसभेच्या जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते.
काँग्रेस-शिवसेनेत रस्सीखेच सुरूच; तोडगा न झाल्याने संजय राऊत बैठकीतून निघून गेले
(संग्रहित छायाचित्र)

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीत जागावाटपावरून सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले जात होते. मात्र, काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात एकमत होताना दिसत नाही. गुरुवारी सिल्व्हर ओकमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगली आणि मुंबईतील लोकसभेच्या जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते. यावर एकमत होत नसल्याने शिवसेनेचे खा. संजय राऊत काहीही न बोलता बैठकीतून निघून गेले. त्यामुळे पुन्हा जागावाटप रखडले आहे. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येत्या एक-दोन दिवसांत जागावाटप निश्चित होईल, असे सांगितले.

जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी गुरुवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मतभेद असलेल्या जागांवर मार्ग काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. भिवंडीच्या जागेबाबत राष्ट्रवादी आग्रही आहे. मात्र, काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही. दुसरीकडे काँग्रेस सांगलीच्या जागेवर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा सोडण्यात येणार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाकडे कोल्हापूरची जागा असताना काँग्रेस किंवा छत्रपती शाहू महाराज यांनी कुठलीही बातचित न करता ही जागा त्यांच्याकडे घेतली. त्यावेळी आम्ही काहीही बोललो नाही, असे खा. राऊत म्हणाले. त्यामुळे सांगलीची जागा आम्हाला सोडलीच पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले. परंतु काँग्रेस सांगलीची जागा सोडायला तयार नाही.

यासोबतच काँग्रेसने मुंबईत दोन जागांची मागणी लावून धरली आहे. त्यामध्ये दक्षिण-मध्य मुंबई आणि उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेचा समावेश आहे. दक्षिण-मध्य मुंबईत मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासाठी आणि उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ माजी खासदार संजय निरुपम यांच्यासाठी सोडण्याची मागणी काँग्रेसने केली. परंतु शिवसेना ठाकरे गटाने या दोन्ही जागा द्यायला विरोध दर्शविला आहे. कारण या दोन्हीही जागा शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे या जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगण्यात आले. यावरून बैठकीत चांगलीच खडाजंगी झाल्याचे समजते. त्यामुळे खा. संजय राऊत मीडियाशी न बोलताच निघून गेले. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चांगलाच अंगलट येऊ शकतो.

सांगलीत काँग्रेस आक्रमक

शिवसेना ठाकरे गटाकडे असलेली कोल्हापूरची जागा काँग्रेसने खा. शाहू महाराजांसाठी सोडली. मात्र, त्यावेळीही आमच्याशी सल्लामसलत न करताच जागा शाहू महाराजांसाठी घेण्यात आली. त्या बदल्यात सांगलीची जागा सोडण्याऐवजी काँग्रेसने याच जागेवरून आक्रमक भूमिका घेतली. आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. शिवसेनेने येथून डबल केसरीचा मानकरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. येथे काँग्रेसचे युवा नेते आणि वसंततादा पाटील यांचे नातू विशाल पाटील मागच्या काही वर्षांपासून तयारीला लागले होते. जागावाटपाच्या वादात विशाल पाटील यांच्याबाबतत अनिश्चितता पहावयास मिळत आहे. येत्या २ दिवसांत यावर काय तोडगा निघतो, हे पाहावे लागेल.

मविआला फटका?

मुंबईतील उत्तर-पश्चिम मुंबई आणि दक्षिण-मध्य मुंबईच्या जागेबाबत आता काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली आहे. अगोदरच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. यावरून या मतदारसंघातील दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांत आपोआप संदेश जाऊन मित्रपक्षाचे नेतेच एकमेकांविरोधात उठण्याची शक्यता असते. या जागेवरून मतैक्य न झाल्यास मविआला फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in