सांगलीत उमेदवारीचा गुंता वाढणार; ठाकरे गटाची तयारी, काँग्रेसचाही दावा 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच नेहमी लढत राहिलेली आहे.
सांगलीत उमेदवारीचा गुंता वाढणार; ठाकरे गटाची तयारी, काँग्रेसचाही दावा 

विशेष प्रतिनिधी/मुंबई 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. येथे कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच नेहमी लढत राहिलेली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचे युवा नेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी येथे लोकसभेची आधीच तयारी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या जागेवर आग्रही आहे. परंतु शिवसेना ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा मिळत नसल्याने नाराजी वाढली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनवेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले चंद्रहार पाटील आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असून, त्यासाठी त्यांनी ५०० गाड्यांच्या ताफ्यासह मातोश्री गाठली. एका अर्थाने हे त्यांचे शक्तिप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही जागा कॉंग्रेसला न सुटल्यास कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद वाढण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेत सांगली कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी दिले आहेत. त्यामुळे आघाडीत तर बिघाडी होणार नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजयकाका पाटील हे भाजपचे आहेत. ते दोनवेळा खासदार राहिलेले आहेत. मात्र, यावेळी त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आता नेमके कोणाला मैदानात उतरविणार, याबाबत अद्याप संकेत दिलेले नाहीत. मात्र, जर सांगलीची जागा शिवसेनेला सुटली, तर मग थेट विशाल पाटील यांनाच भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु विशाल पाटील यांनी एकवेळ उमेदवारी मागे घेऊ. परंतु भाजपमध्ये जाणार नाही, असे म्हटले. त्यामुळे ते सध्या भाजपमध्ये जाणार नाहीत, असे बोलले जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी विशाल पाटील यांनी आमच्या हेलिकॉप्टरचे पायलट माजी मंत्री विश्वजीत कदम आहेत. त्यामुळे ते जिथे उड्डाण घेतील, मी तिथे असेन. असे सांगून कॉंग्रेस सोडून उमेदवारी घेण्यापेक्षा एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे, असे म्हटले. त्यामुळे विशाल पाटील यांनी आता जरी संयमाची भूमिका घेतली असली, तरी खुद्द विश्वजीत कदम सांगलीचे भावी खासदार विशाल पाटील हेच आहेत. आता आमचे ठरलेले आहे, असे म्हटले. त्यामुळे उमेदवारीवरून कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील वाद ठाकरेंसाठी घातक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

दोनवेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले चंद्रहार पाटील यांनी सोमवारी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी अगोदरच सांगलीतून निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी वंचितनेही त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली होती. परंतु आता त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने आता सांगलीतून त्यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी साेमवारी शक्तिप्रदर्शन करीत ५०० गाड्यांचा ताफा मातोश्रीवर नेला होता. यावेळी त्यांच्या समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना ठाकरे गटाची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, सांगलीत ठाकरे गट घुसल्यामुळे राजकीय समीकरण कसे बदलणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

…मी निर्णय घेतलेला नाही, पण बाजी पलटू शकते

मी अजून काहीही ठरवलेले नाही. पुढील वाटचालीबाबत आताच चर्चा करणे योग्य नाही. त्या चर्चेला मुळात अर्थच नसतो. कारण राजकारण हे क्षणाला बदलत असते. त्यामुळे मी आज कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तथापि, बाजी कशीही पलटू शकते, असे सांगत आमदार निलेश लंके यांनी तूर्त निर्णय घेतला नाही. परंतु भविष्यात काहीही निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगत स्पष्ट संकेत दिले. दरम्यान, याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीला कमी जागा मिळत असल्याने कदाचित लोकसभा लढविण्याच्या दृष्टीने लंके विचार करीत असतील, असे म्हटले, तर आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार लंके यांना अजित पवार यांच्यासोबत राहण्यातच भवितव्य आहे. त्यामुळे त्यांनी असा कुठलाही निर्णय घेऊ नये. कारण हे लोक तुमच्याच खांद्यावर बंदूक ठेवून लढतील, असे म्हटले. यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in