मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली.
मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी मंगळवारी भेट घेतली. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून फक्त काही जागांचा तिढा कायम आहे. या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. त्यांच्यासोबत खा. संजय राऊतदेखील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते. भाजपची केंद्रीय पातळीवरील पहिली यादी घोषितही झाली आहे. मात्र, महायुतीची महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा अद्याप अंतिम झालेली नाही. महाविकास आघाडीचेदेखील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. ठाकरे गट २३, काँग्रेस १५ आणि शरद पवार गट १० असे जागावाटपाचे सूत्र अंतिम झाल्याचे समजते. यातील काही जागा आपापल्या मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. तर काही जागांची अदलाबदल होणार आहे.

काही जागांचा तिढा अद्याप कायम आहे. कोल्हापूरमधून काँग्रेस शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे. कोल्हापूर तुम्हाला हवे असेल तर सांगली आम्हाला द्या, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. पण शाहू महाराज छत्रपती यांनी ‘मशाल’ चिन्हावर लढायचा निर्णय घेतला तर त्यांचे स्वागतच असेल, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. दुसरीकडे वंचितचाही मुद्दा आहेच.

या सर्व मुद्द्यांवर एकमत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीत जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मविआची आज बैठक

दरम्यान, जागावाटपाच्या मुद्यावर बुधवारी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह वरिष्ठ नेते, वंचितचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची बैठक होणार आहे.

शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून लढणार?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. मात्र, ते ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती न घेता काँग्रेस पक्षाचा हात धरणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. २०१४ नंतर संभाजीराजे यांना राज्यसभेत जाण्याची संधी भाजपने दिली. दोन वर्षांपूर्वी विधानसभेतून निवडल्या जाणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांनी उभे रहावे म्हणून शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरला. फडणवीस यांनीही मदत करण्याची भूमिका घेतली. पण शेवटच्या क्षणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणूनच लढण्याची अट ठाकरे यांनी संभाजीराजेंना घातली आणि संभाजीराजे छत्रपतींना त्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. छत्रपती घराण्याला त्यावेळी समर्थन देऊनही उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना अट घालून कोंडी केल्याचे शल्य छत्रपती घराण्याला आजही आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in