"माझं मराठ्यांना शेवटचं सांगणं आहे...", मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला भावनिक आवाहन

जसजसे आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे सरकतील, तसा जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे आंदोलन हाताळण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे.
"माझं मराठ्यांना शेवटचं सांगणं आहे...", मुंबईकडे कूच करण्यापूर्वी मनोज जरांगेंचं मराठा समाजाला भावनिक आवाहन

"माझं मराठ्यांना शेवटचं सांगणं आहे, मी तुमच्यात असेन नसेन मला माहित नाही, मराठ्यांची ही एकजुट फुटू द्यायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटायचं नाही. आपल्या मुलांना संपवण्याचा घाट का घातला आहे. आपली मुलं संपली पाहिजेत, असं त्यांना वाटत आहे, आमचं आंदोलन हे सहज घेत आहेत. आमच्या नोंदी सापडूनही हे आरक्षण देत नाहीत", असे भावनिक आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मुंबईकडे कूच करण्यापूर्वी केले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह जालन्यातील अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. जरांगे पाटील हे 26 जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार असून त्या दिवसापासून ते आमरण उपोषण करणार आहेत.

असा असणार प्रवास-

आज अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा समाजातील आंदोलक रात्री शिरूर तालुक्यातील मातोरी येथे मुक्काम करणार आहेत. 21 तारखेला दुपारी पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी येथे भोजन करून रात्रीचा मुक्काम हा करंजी घाटातील बाराबाभली येथे असणार आहे. तर, 22 जानेवारीला आंदोलक दुपारी सुपा येथे जेवणासाठी थांबणार असून रात्रीचा मुक्काम रांजणगाव गणपती येथे करणार आहेत. 23 जानेवारी रोजी दुपारपर्यंत आंदोलक कोरेगाव भीमा येथे पोहोचतील. त्यादिवशी त्यांचा रात्रीचा मुक्काम हा चंदननगर येथे असणार आहे. 24 जानेवारी रोजी आंदोलक पुण्यात पोहोचतील. तर, रात्रीचा मुक्काम लोणावळा येथे करण्यात येणार आहे. 25 जानेवारी रोजी आंदोलक घाट उतरून पनवेल येथे दाखल होतील. यावेळी त्यांचा वाशी येथे मुक्काम असणार आहे. 26 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व मराठा आंदोलक मुंबईतील चेंबूर येथून पदयात्रेद्वारे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे दाखल होतील.

राज्य सरकारसमोर मोठे आव्हान-

जसजसे आंदोलक मुंबईच्या दिशेने पुढे सरकतील, तसा जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातून अनेक युवक जरांगे-पाटील यांच्या दिंडीत सामिल होण्यासाठी गाड्या घेऊन रवाना झाले. सर्व लवाजम्यासह हे युवक जात आहेत. त्यामध्ये बिस्कीट पुडे, अन्नधान्य, पाणीही सोबत घेतले आहे. मुंबईत थांबण्याची वेळ आल्यास अन्नधान्य कमी पडू नये, याची तयारी या आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आंदोलन कितीही दिवस चालले तरी माघार नाही, या निर्धारानेच आंदोलक जरांगे-पाटील यांच्यासोबत रवाना झाले आहेत. त्यामुळे आता हे आंदोलन हाताळण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in