

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नेरला गावात एका घरातून तब्बल ४० कोब्रा सापाची पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली. राजू ढोमने यांच्या घरात ही घटना घडली. मात्र, सर्पमित्र आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे नागाच्या सर्व पिल्लांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली.
पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे बिळांमध्ये पाणी साचल्याने अनेक सर्प आणि इतर सरपटणारे प्राणी मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. त्यातून सापाने या पिल्लांना घरात मार्ग शोधून सुरक्षित ठिकाण पाहून जन्म दिला असावा, अशी शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे. वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे सर्पमित्र तथा प्राणिमित्र रतन कुंभरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घरातील ४० पिल्लांना पकडून जंगलातील त्यांच्या सुरक्षित अधिवासात सोडले.
दरम्यान, अशा प्रकारे कोणाच्या घरात किंवा गावात मोठ्या संख्येने सर्प किंवा सर्पाची पिल्ले आढळल्यास प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वनविभागाशी तत्काळ संपर्क साधावा तसेच सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता जवळच्या सरकारी अथवा रुग्णालयात जावे, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.