
नागपूर : नागपूर दंगलीतील आरोपीचे घर बुलडोझरने पाडल्याप्रकरणी बुधवारी महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी उच्च न्यायालयात माफी मागितली. कोर्टाच्या स्थगितीच्या आदेशाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे कारण त्यांनी यावेळी दिले.
नागपूरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली होती. फहीम खानच्या आईने कोर्टात धाव घेतल्यानंतर बुलडोझर कारवाईला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली होती. मात्र, त्यापूर्वीच पालिकेने आरोपीचे घर बुलडोझरने पाडले.
सुप्रीम कोर्टाने हिंसाचारातील आरोपींच्या मालमत्तेबाबत, कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याशिवाय कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही कारवाई करण्यात आली.