नागपूर स्फोट : मृतांचा आकडा वाढला; संचालक, व्यवस्थापकाला अटकेनंतर लगेच जामीन

चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लिमिटेडच्या कारखान्यात गुरुवारी झालेल्या स्फोटात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी...
नागपूर स्फोट : मृतांचा आकडा वाढला; संचालक, व्यवस्थापकाला अटकेनंतर लगेच जामीन
पीटीआय
Published on

नागपूर : येथील चामुंडी एक्स्प्लोसिव्ह प्रा. लिमिटेडच्या कारखान्यात गुरुवारी झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. येथे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक जय शिवशंकर खेमका व कंपनीचे व्यवस्थापक सागर देशमुख यांना अटक करण्यात आली असून, त्यांना नंतर जामीनही मंजूर करण्यात आला.

खेमका व देशमुख यांना अटक करून तातडीने न्यायालयासमोर उभे करण्यात आले. तेव्हा हिंगणा येथील प्रथमवर्ग महानगर दंडाधिकाऱ्यांनी ५० हजार रुपयांच्या रोख रकमेवर त्यांचा जामीन मंजूर केला. या स्फोटात ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर, मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. प्रांजली मोदरे, प्राची फालके, वैशाली क्षीसागर, मोनाली अलोणे, पन्नालाल बंदेवार यांचा मृतांमध्ये समावेश आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान शीतल चटप या महिला कामगाराचा मृत्यू झाला. तर अजून एका मृताबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

नागपूरजवळील धामना येथे स्फोटके तयार करणाऱ्या चामुंडा कंपनीत दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्यावेळी कंपनीत १० ते १२ कामगार कामावर होते.

मृतांच्या नातेवाईकांना एकूण ३५ लाखांची नुकसानभरपाई

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले, तर राज्य सरकार १० लाख रुपये नुकसानभरपाई देणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

logo
marathi.freepressjournal.in