नागपूर : स्वातंत्र्यदिनी पोलीस ठाण्यातील डान्स भोवला; दोन महिला पोलिसांसह चौघे निलंबित

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंदी चित्रपटातील गाण्यावर केलेला भन्नाट डान्स चार पोलिसांना चांगलाच गोत्यात आणणारा ठरला. याप्रकरणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथील पोलीस ठाण्यातील चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नागपूर : स्वातंत्र्यदिनी पोलीस ठाण्यातील डान्स भोवला; दोन महिला पोलिसांसह चौघे निलंबित
Published on

नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हिंदी चित्रपटातील गाण्यावर केलेला भन्नाट डान्स चार पोलिसांना चांगलाच गोत्यात आणणारा ठरला. याप्रकरणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथील पोलीस ठाण्यातील चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला पोलिसांचा समावेश आहे.

पंधरा ऑगस्ट रोजी शहरातील तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर गाणी वाजवण्यात येत होती. त्यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने 'छोरा गंगा किनारे वाला' हे गाणे गायले. तो हे गाणे गात असताना अचानक पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी व निर्मला गवळी या दोघींसह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर व पोलीस हवालदार अब्दुल गणी या चार जणांनी त्याच्या गाण्यावर ठेका धरला. या घटनेचा व्हिडिओ तेथील कर्मचाऱ्याने चित्रित केला.

पोलिसांमध्ये नाराजीचा सूर

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून पोलिसांवर गणवेशात डान्स करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित चारही पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली. मात्र, या कारवाईमुळे पोलिसांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. कारवाई करण्यात आलेले चारही पोलीस स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी झाले होते व त्यांनी देशभक्तीपर गाणीही गायिली होती. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तणाव हलका करण्यासाठी त्यांनी गाण्यावर नृत्य केले. त्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करणे अन्यायकारक आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in