नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर उत्पादन; ‘मॅक्स एरोस्पेस’शी करार, ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार

नागपुरात ८ हजार कोटी रुपये गुंतवणूक करून हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि.’ आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला.
नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर उत्पादन; ‘मॅक्स एरोस्पेस’शी करार, ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार
Published on

नागपूर : नागपुरात ८ हजार कोटी रुपये गुंतवणूक करून हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि.’ आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. अन्बलगन आणि ‘मॅक्स एरोस्पेस’चे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार ‘मॅक्स एरोस्पेस’ नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार आहे. या कारखान्याच्या उभारणीचे काम २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगारनिर्मिती होणार असून आठ वर्षांमध्ये सुमारे ८ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र बनेल

हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादनासाठी समर्पित असलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असेल. यामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे. या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in