गडकरींकडून आचारसंहितेचे उल्लंघन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची तक्रार

लोकसभा निवडणुकीआधी एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका.
गडकरींकडून आचारसंहितेचे उल्लंघन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची तक्रार

प्रतिनिधी/मुंबई

भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊन नितीन गडकरी आणि भाजपवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला आहे. १ एप्रिल २०२४ रोजी एनएसव्हीएम फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान वैशाली नगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत शाळकरी मुले सहभागी केली होते. हा सरळसरळ कायद्याचा गैरवापर असून अत्यंत गंभीर प्रकार आहे. शाळकरी मुलांचा राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या प्राचार्यांना निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच तसेच मुंबई उच्च न्यायालयाने २०१४ साली दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन केले आहे. निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी लोंढे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीआधी एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही. पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही. मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका. परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र गडकरी यांना नागपूरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहेत,” असा टोलाही लोंढे यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in