विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे संदेश पाठविणारा गोंदियाचा रहिवासी, ओळख पटली; अटकेसाठी विशेष पथक स्थापन

विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीचे संदेश देऊन भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या इसमाची नागपूर पोलिसांनी ओळख पटवली आहे.
विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमकीचे संदेश पाठविणारा गोंदियाचा रहिवासी, ओळख पटली; अटकेसाठी विशेष पथक स्थापन
Published on

नागपूर : विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीचे संदेश देऊन भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या इसमाची नागपूर पोलिसांनी ओळख पटवली आहे. सदर इसमाचे नाव जगदीश उईके (३५) असे असून तो गोंदियाचा रहिवासी आहे. जगदीश याने दहशतवादावर एक पुस्तक लिहिले असून त्याला एका गुन्ह्यात २०२१ मध्ये अटकही करण्यात आली होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

धमकीचे संदेश उईके याने पाठविल्याचा छडा पोलिसांनी लावल्यानंतर तो पसार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीचे संदेश पाठविण्यात आल्याने काही दिवसांपूर्वी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांना विलंब होण्याचे, काही विमानांचे मार्ग बदलावे लागण्याचे आणि विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करावी लागण्याचे प्रमाण वाढले होते.

विशेष पथक स्थापन

उईके याने पंतप्रधानांचे कार्यालय, रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विमान कंपन्यांची कार्यालये, पोलीस महासंचालक, रेल्वे सुरक्षा बल यांनाही धमकीचे ई-मेल पाठविल्याचे निष्पन्न झाले आहे. उईके याने सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही संदेश पाठविला होता. गुप्त दहशतवादी कोडचे सादरीकरण करण्याची संधी न दिल्यास निदर्शने करण्याची धमकी त्याने दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची विनंतीही त्याने केली होती. उईके याला पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in