
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी बंगळुरू रेल्वे स्थानकावरून तीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यात अजनी (नागपूर) -पुणे, बंगळुरू - बेळगाव आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा - अमृतसर या गाड्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, अजनी - पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आतापर्यंतची सर्वात लांब अंतर कापणारी वंदे भारत गाडी असेल. ती एकूण ८८१ कि.मी. अंतर कापेल. ही महाराष्ट्रातील १२वी वंदे भारत गाडी असून वर्धा-अकोला-शेगाव-भुसावळ-जळगाव-मनमाड-पुणतांबा-दौंड या मार्गावरील पहिलीच वंदे भारत गाडी आहे. नागपूर-पुणे दरम्यान ही सर्वात वेगवान गाडी असून ती ७३ किमी/तास वेगाने धावणार आहे आणि तिचे १० स्थानकांवर थांबे असतील.
या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड चोर्ड लाईन येथे थांबे असून १ एक्झिक्युटिव्ह चेअर कार (ईसी) - ४४ आसने, ७ चेअर कार (सीसी) - ५४६ आसने, एकूण प्रवासी क्षमतेसाठी ५९० जागा आहेत. तसेच डब्यांची रचना एकूण ८ आहे.
देशात सध्या ७२ वंदे भारत गाड्या चालू असून त्या २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रवास सुविधा देत आहेत. १४४ सेवा चालविल्या जात असून येत्या ३ वर्षांत २०० हून अधिक वंदे भारत गाड्या सुरू करण्याचे भारतीय रेल्वेचे नियोजन आहे.
नागपूर हे शिक्षण, वैद्यकीय, उद्योग आणि पर्यटनाच्या दृष्टीने वेगाने विकसित होणारे शहर असून ऑरेंज सिटी, हेल्थ केअर सिटी आणि राज्याची हिवाळी राजधानी म्हणून ते ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित दीक्षाभूमी, रामटेक येथील राम मंदिर, विविध वन्यजीव अभयारण्यांमुळे नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, असेही म्हटले जाते. एम्स आणि अनेक वैद्यकीय संस्था येथे कार्यरत आहेत. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जात असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित लाल महाल, शिवनेरी किल्ला, शनिवारवाडा तसेच दगडूशेठ हलवाई मंदिर, आळंदी, जेजुरी यांसारख्या धार्मिक स्थळांमुळे प्रसिद्ध आहे.
सोमवारपासून नियमित सेवा
गाडी क्र. २६१०१ पुणे ते अजनी वंदे भारत एक्सप्रेस
मंगळवार वगळता दररोज
सकाळी ६.२५ वाजता पुणे येथून सुटणार
सायंकाळी ६.२५ वाजता अजनीला (नागपूर) पोहोचणार
प्रभावी सेवा ११ ऑगस्ट २०२५ पासून
गाडी क्र. २६१०२ -अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस
सोमवार वगळता दररोज
सकाळी ९.५० वाजता अजनीहून (नागपूर) सुटणार
रात्री ९.५० वाजता पुण्याला पोहोचणार
प्रभावी सेवा १२ ऑगस्ट २०२५