नागपूर : राज्यातील सत्तारूढ महायुती आणि भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असा सज्जड दम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे पदाधिकाऱ्यांना दिला.
केंद्रीय गृहमंत्री मंगळवारी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नागपूरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहा यांनी कार्यकर्त्यांना रणनीतीबाबत मार्गदर्शन करताना सज्जड दम दिला.
राज्य विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, राष्ट्रीय पक्षांचे नेते राज्यातील नेत्यांसमवेत बैठका घेऊन रणनीती ठरवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी शहा यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भाजपला विदर्भच ही निवडणूक जिंकून देणार आहे, मतदारसंघात गटबाजी सहन केली जाणार नाही, उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. काही दिवसांत सणासुदीचे दिवस येत आहेत. कार्यक्रम आणि उत्सवासाठी लोक एकत्र येतात. त्यामुळे विजयादशमीपासून धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बुथवर तरुण कार्यकर्त्यांनी फिरले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मोदींचा गुरुवारी पुणे दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २६ सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर एस.पी. कॉलेजच्या मैदानावर पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे.