Nagpur : नायब तहसीलदारांना थेट जेसीबीला लटकवून नेले फरफटत

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे.
Nagpur : नायब तहसीलदारांना थेट जेसीबीला लटकवून नेले फरफटत
Nagpur : नायब तहसीलदारांना थेट जेसीबीला लटकवून नेले फरफटत
Published on

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरूम माफियांनी थेट चालत्या जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल आणि पोलिस प्रशासनात संतापाची लाट उसळली असून मुरूम माफियांची वाढती दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनीही पोस्टच्या माध्यमातून टीका केली आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे हे आपल्या पथकासह कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. महसूल पथकाने जेसीबी आणि इतर यंत्रणा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायद्याचा धाक न बाळगता जेसीबी चालकाने वाहन थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने पळवण्यास सुरुवात केली. यावेळी निकाळजे यांनी जेसीबी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वाहनासोबत ओढत नेण्यात आले.

सरकारी अधिकाऱ्याच्या जीवाशी खेळ

या संपूर्ण प्रकाराने काही काळ परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नायब तहसीलदारांना चालत्या जेसीबीला लटकवून आरोपींनी गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. जवळपास चार किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. दरम्यान, पोलिसांची वाहने घटनास्थळाकडे येताना दिसताच जेसीबी चालक घाबरला आणि वाहन सोडून पळून गेला. सरकारी अधिकाऱ्याच्या जीवाशी खेळ करत अशा प्रकारे हल्ला झाल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाडस किती वाढले आहे, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in