
नागपूर : औरंगजेबाच्या कबरी उखडून टाकण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने दिल्यानंतर नागपुरात दंगल उसळली होती. या दंगलीच्या घटनेनंतर नागपुरातील एकूण ११ ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. यातील काही ठिकाणाची संचारबंदी गुरुवारी उठवण्यात आली होती. आता रविवारी नागपुरातील सर्वच भागांमधील संचारबंदी उठवण्यात आली आहे. तसे आदेश नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिले आहेत.
नागपुरात उसळलेल्या दंगलीनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, दंगलग्रस्त भागाशिवाय अन्य परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे टप्प्याटप्य्याने संचारबंदी उठविण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती.
गुरुवारी नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णत: हटविण्यात आली. तर शनिवारी पुन्हा पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामध्ये परिमंडळ-३ अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ-४ अंतर्गत येणाऱ्या सक्करदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे. मात्र, यशोधरानगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती. कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. पण रविवारी दुपारी ३ वाजल्यापासून नागपुरातील संचारबंदी संपूर्णत: उठविण्यात आली आहे.