नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाची महत्त्वाची बैठक या आठवड्यात नागपूरात सुरू होत असून या बैठकीत देशातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिनिधींची ही बैठक तीन दिवसांची असून ती १५ ते १७ मार्च दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती भवन संकुलात ही बैठक होईल. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली..
रा. स्व संघाशी संलग्न संघटनांचे १५२९ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहाण्याची अपेक्षा आहे. नागपुरात सहा वर्षानंतर संमेलन होणार आहे. असे सांगून आंबेकर यांनी रा. स्व. संघाला १०० वर्षे पुढील वर्षी २०२५ मध्ये होत असल्याचे सांगितले.
दरम्यान या तीन दिवसांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे विषय चर्चेसाठी घेण्यात येतील व त्यावर ठरावही मंजूर केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये राम मंदिराच्या अभिषेकनंतर निर्माण झालेले ‘सकारात्मक वातावरण’ कसे पुढे नेले जाऊ शकते, यावर एक ठराव मंजूर केला जाईल. देशातील सद्यस्थिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हाती घेतले जाणारे सामाजिक कार्य यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.
भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संघाच्या ३६ संघटनांचे प्रमुख, संघटक सचिव, रा. स्व. संघ संलग्न इतर संघटना प्रतिनिधी सभेत भाग घेतील, असे आंबेकर यांनी सांगितले.
कार्यकारिणी व सरकार्यवाहांची निवड होणार
संघाच्या 'अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळ' आणि त्याचे 'सरकार्यवाह' (सरचिटणीस) यांच्या सदस्यांची निवड या बैठकीत होणार आहे.
एक लाखावर शाखांची संख्या नेणार
संघाने २०२३-२४ मध्ये केलेल्या सर्व कामांचा आणि 'सेवाकार्या'चा आढावा घेतला जाईल आणि २०२४-२५ मधील संघाच्या योजनांवर चर्चा केली जाईल. संघ शाखांची संख्या सध्या ६८ हजार असून ती एक लाखावर नेण्याची योजना आहे. पुढील वर्षी संघ शताब्दी वर्ष साजरे होण्यापूर्वी ही एक लाख शाखांची संख्या करण्याचे उद्दिष्ट आहे, असे आंबेकर म्हणाले.