राज्यात रामराज्य कधी येणार? नागपुरच्या दुसऱ्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा सवाल

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विविध मुद्यांवर भाष्य केले.
राज्यात रामराज्य कधी येणार? नागपुरच्या दुसऱ्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा सवाल
@ShivSenaUBT_

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विविध मुद्यांवर भाष्य केले. राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होते. शेतकऱ्यांच्या सोन्यासारख्या पिकाचे नुकसान झाले, मात्र पंचनामा करायलाही सरकारी अधिकारी वेळेवर जात नाहीत. आता पंचनामे कशाला करता, मयताला या, असे शेतकरी म्हणतात. ते त्यालाही जातील. पण मग राज्यात, देशात रामराज्य कधी येणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.

“अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, ही आनंद आणि अभिमानाची गोष्ट आहे. पण, हा पुरस्कार देणारे घराणेशाहीच्या विरोधात देशभर बोंबलत आहेत. मात्र, त्यांना एका समाजसेवा करणाऱ्या घराण्यासमोर झुकावे लागले. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेला कोणीही असला, तरी समोर सच्चा समाजसेवक असल्यावर झुकावेच लागेल. हे महाराष्ट्राने आज संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे,” अशा शब्दांत ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही तोफ डागली.

“हिंडेनबर्ग अहवाल फालतू असेल, मग इतके का हादरलात? राहुल गांधीजींना अपात्र ठरवले. सत्यपाल मलिक तर भाजपचे, त्यांनी केलेला गौप्यस्फोट मानणार की नाही. मलिक यांनी भयंकर गोष्टी सांगितल्या. वाजपेयीजी म्हणायचे, सरकारे येतील-जातील पण देश असायला हवा. सगळे गद्दारांना घेऊन कारभार सुरू आहे ही सत्तेची नशा. गेल्या ८-९ वर्षांत मोदींनी देशासाठी काय केले ते अगोदर सांगा,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

“मी अयोध्येला गेलो, तेव्हा सुनील केदारसुद्धा सोबत होते. शिवसेनेने ‘पहिले मंदिर फिर सरकार’ हा नारा दिला. आम्ही कायदा करा म्हणालो, पण मोदींनी धाडस केले नाही. आता कोर्टाने निकाल दिल्यावर श्रेय घेताहेत. मुख्यमंत्री खरच रामभक्त असते तर सुरत, गुवाहाटी न जाता अयोध्येला गेले असते. फडणवीस कधी अयोध्येला गेले होते का? तेव्हा गेले नाही म्हणून फडणवीस आता गेले. बाबरीच्या वेळेस चंद्रकांत पाटील आणि त्यांचे काका गेले होते का? भाजपच्या गोटात तेव्हा पळापळ सुरू होती. शिवसेनाप्रमुखांचा तुम्ही अपमान करता. संघाला चंद्रकांत पाटलांचे म्हणणे पटतेय का?,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in