
नागपूर : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार ३८ वर्षीय फहीम शमीम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. फहीम खान हा ‘मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी’चा (एमडीपी) नागपूर शहर अध्यक्ष आहे. त्याने २०२४ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढविली होती. फहीम खानच्या भाषणानंतर जमाव भडकला आणि त्यांनी मोठा हिंसाचार घडवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांच्या तपासातून त्याने जहाल भाषण केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर नागपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक होऊन जमावाने काही भागातील घरे आणि वाहने जाळली, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.
फहीमविरुद्ध सहा गुन्हे
फहीम खान नागपूरमधील संजय बाग कॉलनीतील यशोधरा नगरमध्ये राहतो. नागपुरातील हिंसाचाराचा कट आधीच रचला गेल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. फहीम खान यानेच काही कट्टरपंथी लोकांना एकत्र करुन सुनियोजित पद्धतीने हिंसाचार घडवल्याचा पोलिसांचा आरोप आहे. दरम्यान, फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत गुन्हे दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. लोकसभा निवडणूकीत त्याला १ हजार ७३ मते मिळाली होती. तो यशोधरानगरातून गणेशपेठेत पोहोचला कसा, याचा तपासदेखील सुरू आहे.
पोलीस आयुक्तांकडून पाहणी
नागपूरमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर आता शहरातील अनेक ठिकाणी संचारबंदी जारी करण्यात आली असून पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ज्या ठिकाणी दंगलीची ठिणगी पडली, त्या घटनास्थळाची नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी बुधवारी पाहणी केली आणि स्थितीचा आढावा घेतला. अनेक ठिकाणी जारी करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे इमामवाडा, यशोधरानगर यासह आठ ते नऊ परिसरांमध्ये शुकशुकाट होता.
नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी आतापर्यंत सहा एफआयआर दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणात कारवाई सुरू आहे. ज्या लोकांची नावे ह्या प्रकरणात समोर आली आहेत, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आणि फोटोच्या आधारे देखील लोकांची चौकशी केली जात आहे.
महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग
दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीच्यादरम्यान एक महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. दंगलखोरांनी अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचारीचा विनयभंग केला. यासंदर्भात तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. दगडफेकीच्या घटनेत अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. त्यामध्ये काही महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
दंगलीच्या ‘पॅटर्न’चा शोध सुरू
आतापर्यंत एफआयआरमध्ये पुढे आलेली आरोपींची नावे नागपूरमधील आहेत. मात्र, या प्रकरणात बाहेरील लोकांचा संबंधही उघड होत आहे. तथापि, यावर आता बोलणे संयुक्तिक होणार नाही. संचारबंदी कधीपर्यंत लागू राहील हे सांगणे आत्ताच कठीण आहे. मात्र, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. दंगलीचा पॅटर्न कोणता आहे हे आम्ही शोधत आहोत. दगडफेक झाली, आधी दगड नव्हते, ते कुठून आले याचा तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
आतापर्यंत ५० आरोपींना अटक
दरम्यान, आतापर्यंत ५० आरोपी आणि ७ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून, आणखी अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूरमधील दहा पोलीस क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू आहे. परिस्थिती शांततापूर्ण आहे. तपासात सहकार्य मिळत आहे. दंगलग्रस्त भागातील सीसीटीव्ही कॅमेरे कसे खराब झाले, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, असे पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितले.