ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यंदाचा ‘नागसेन गौरव पुरस्कार’ जाहीर; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्राचे मान्यताप्राप्त कवी, ललित लेखक, समीक्षक आणि विचारवंत म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठातील २७ विद्यार्थ्यांनी संशोधन केले असून...
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यंदाचा ‘नागसेन गौरव पुरस्कार’ जाहीर; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : नागसेन फेस्टिव्हल अंतर्गत पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यास प्रदान करण्यात येणारा मानाचा 'नागसेन गौरव पुरस्कार' ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर करण्यात आला आहे.

मिलिंद नागसेनवन हे साहित्य चळवळीचे ते मानबिंदू आहेत. त्यांनी हस्तलिखित पाक्षिक, भित्तीपत्रकाची चळवळ यातून ल. बा. रायमाने यांच्या सोबत वाङ् मयीन चळवळीत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे. पुढे मिलिंद साहित्य परिषद, अस्मिता या त्रैमासिक चळवळीत त्यांनी लिखाण केले.

त्यांनी शेकडो साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले असून, सुमारे १२५ च्यावर ग्रंथ, कविता संग्रह, समीक्षा ग्रंथ, वैचारिक साहित्य साहित्याचे त्यांनी लिखाण केले असून दलित पँथरच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.

महाराष्ट्राचे मान्यताप्राप्त कवी, ललित लेखक, समीक्षक आणि विचारवंत म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठातील २७ विद्यार्थ्यांनी संशोधन केले असून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील बहुतांश विद्यापीठात त्यांच्या साहित्यावर एम.फील केलेले शेकडो विद्यार्थी आहेत.

त्यांच्या अनेक पुस्तकांचा हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला असून नागपूर विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख व अकॅडमिक स्टाफ कॉलेजचे प्रचार्यपदही त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार यांच्या सोबतच मनाच्या मिलिंद हे समता पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांची बाणेदार भूमिका, स्पष्टवक्तेपणा यामुळे साहित्यक्षेत्रात त्यांचा दबदबा राहिला आहे. त्यांनी आयुष्यभर आंबेडकरी बाणा जोपासला असून काही पुरस्कारांना थेट नाकारल्याने त्यांची भूमिका चर्चेत राहिलेली आहे.

या प्रतिभावान माजी विद्यार्थ्याला नागसेन फेस्टिव्हलच्या समारोप प्रसंगी लुम्बिनी उद्यान, नागसेनवन येथे दि.३१ मार्च रोजी सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी पु. भन्ते विशुद्धानंद बोधी महास्थविर, सिडनहॅम कॉलेजचे माजी प्राचार्य व्ही. बी. तायडे, माजी प्राचार्य डी. एन. संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in