लाखो मतदारांची नावे गायब; ठाणे, नालासोपारा, कल्याण, भिवंडीतील प्रकार, मतदारांनी विचारला जाब

देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे मतदान ठाणे व पालघर जिल्ह्यात झाले. २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या लाखो उमेदवारांची नावेच मतदार यादीतून गायब असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.
लाखो मतदारांची नावे गायब; ठाणे, नालासोपारा, कल्याण, भिवंडीतील प्रकार, मतदारांनी विचारला जाब
Published on

ठाणे/वसई/कल्याण/डोंबिवली/भिवंडी

देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे मतदान ठाणे व पालघर जिल्ह्यात झाले. २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या लाखो उमेदवारांची नावेच मतदार यादीतून गायब असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. २०-२०, ४०-४० वर्षे आम्ही मतदान केले, पण यावेळी मतदार यादीत नाव नसल्याचे अनेक मतदारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला.

पालघरमधून दीड लाख मतदारांची नावे गायब

वसई : पालघर लोकसभेच्या मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यावर काही तासातच वसई विरार परिसरात अनेक मतदान केंद्र आणि त्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे, तसेच अनेक ठिकाणी पाणीपुरवठा खंडित झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला.

जनतेत बहुजन विकास आघाडी विरोधात रोष निर्माण व्हावा, यासाठी हे खालच्या पातळीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला आहे. तर नालासोपारा व बोईसर मतदारसंघातील तब्बल दीड लाख मतदात्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असल्याचे निरीक्षण बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी नोंदवले असून, या गंभीर प्रकाराविरुद्ध निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नालासोपारा मतदारसंघातून १,०९,०६९ तर बोईसर विधानसभा मतदारसंघातून ५५,३३२ मतदारांची नावे काढून टाकली आहेत. ही नावे जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर वगळण्यात आली आहेत. त्यामुळे पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. निवडणूक प्रशासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि डोळेझाक या सगळ्याला कारणीभूत आहे, असे मत बविआचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे मतदानापासून वंचित राहिलेल्या शेकडो मतदात्यांनीही याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

२०१९ साली नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदार संख्या ५,१२,४२५ होती. २०२४ मध्ये यातील १,०९,०६९ नावे काढून टाकली. बोईसर मतदारसंघात २०१९ साली

३,१४,२१३ मतदारसंख्या होती. त्यापैकी ५५,३३२ नावे यंदा काढून टाकली. २०२४ मध्ये बोईसर मतदारसंघातील मतदारसंख्या ३,८४,२०१ होती. यात १,२६,२४५ मतदार वाढलेले आहे, असे निरीक्षण बहुजन विकास आघाडीने नोंदवले आहे. यंदाच्या याद्या सदोष असल्याने यंदा दीड लाखाहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. याचा थेट प्रभाव मतदान टक्केवारी आणि निकालावर होणार आहे. निवडणूक यंत्रणेच्या निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे.

दरम्यान, बहुजन विकास आघाडीच्या, नालासोपारा व बोईसर मतदार संघातील मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या आरोपांचे शिंदे शिवसेना गटाने खंडन केले आहे. मतदार यादी अद्ययावत करतेवेळी निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष आणि मतदात्यांना कल्पना देण्यात येत असते. त्यानुसार आपण सूचविलेल्या दुरुस्ती झाल्या आहेत किंवा नाहीत, याची पडताळणी करण्याची जबाबदारी राजकीय पक्ष अथवा मतदारांचीच असते. सदोष नावे काढून टाकण्यात किंवा वगळण्यात येतात. अशा चुका कोणी जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर करत नाही. त्यामुळे बहुजन विकास आघाडीने केलेल्या आरोपात तथ्य नाही, अशा शब्दांत शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी खंडन केले आहे.

ठाण्यातही मतदार यादीत गोंधळ कायम

ठाणे : ठाण्यात मतदारयादीत गोंधळाची परंपरा लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावेळी कायम असल्याचे दिसून आली.

मतदान ओळखपत्र आहे. यापूर्वी अनेकदा मतदान केले आहे. तरीही या यादीत नाव नाही, असे प्रकार ठाण्यात घडल्याने अनेक मतदारांना मतदान न करता परत जावे लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर अनेकांनी या प्रकाराबाबत राग व्यक्त केला

या आधीही ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी अनेक मतदारांची नावेच गायब झाली होती. तोच प्रकार याही वेळी घडला. अनेक मतदार नेहमीच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव तपासत होते, मात्र काहींची नावेच त्यातून गायब झाली होती. त्यामुळे त्यांना मतदानच करता आले नाही.

मतदारांनी आपल्या नावाची तपासणी मतदारयादीत मतदानापूर्वी करून घेणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाकडून यासाठी वेळोवेळी जाहीर सूचनाही केलेली असते. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी स्वतंत्र तरतूदही असते. ऐनवेळी नाव शोधून ते नसल्यास अधिकाऱ्यांना दोष दिला जात असल्याचे सांगितले.

आपल्याकडे निवडणूक ओळखपत्र आहे, आपण या आधी अमुक अमुक शाळेत, मतदान केंद्रावर मतदान केले आहे तर आताही तेथेच असेल अशी समजूत अनेकांची समजुत चूकीची ठरली त्या मुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.

निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सुमारे एक लाख मतदारांची यादी मतदान यादीतून गायब झाल्याचा आरोप मनसे कल्याण जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले. हा प्रकार लोकशाहीला घातक असून निवडणूक आयोगाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे, असेही भोईर यांनी सांगितले.

कल्याण (प.) येथे लाखभर मतदार मतदानापासून वंचित

कल्याण : लोकसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात एक लाख मतदारांची नावे गायब झाल्याचे उघड झाले. निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे.

शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, आज मतदानाचा हक्क मी आणि माझ्या परिवाराने बजावला आहे. प्रभागात फिरताना नागरिकांना त्रास झाल्याचे दिसत होते. प्रत्येक प्रभागात अडीच ते तीन हजार मते गायब आहे. ज्या लोकांनी २०१९ च्या निवडणुकीत मतदान केले त्यांची नावे पूर्णपणे गायब आहेत. निवडणूक आयोगाचा कारभार भोंगळ आहे. या बेपर्वाईला जबाबदार असणाऱ्यांवर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी, अंदाजे एक लाख नावे गायब असल्याचे अभ्यासावरून दिसून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तर प्रत्येक वार्डात मतदार आम्हाला मतदार जाब विचारत आहेत. निवडणूक आयोगाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा. येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. अनेक मतदारांचे नाव काढून टाकले आहे. आता निवडणूक आयोगाने पुन्हा सर्वे करून त्याचे नाव मतदारयादीत टाकावे. तसेच अनेक मतदारांचे मतदान केंद्रे लांब आले आहे. मोहन्यातील नावे ऊबर्डेला आलेली आहेत. टिटवाळ्यातील नावे डोंबिवलीत गेली आहेत. हा प्रकार कोणता? नावात ‘प्रिटिंग मिस्टेक’ आहेत. डेटा ऑपरेटर अशिक्षित होते का? असा सवाल रवी पाटील यांनी उपस्थित केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in