
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची जणू शर्यतच सुरू आहे. बीड प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट झाले की, निष्णात वकिलामार्फत आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याप्रमाणे सध्या मुख्यमंत्री बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याने राज्य पेटले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे, असा खोचक टोला पटोले यांनी फडणवीस यांना यावेळी लगावला. दरम्यान, पीकविम्यात घोटाळा झाल्याचे समोर येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का?, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.
सरकारमध्ये परिस्थिती भयावह आहे. सरकारला लाडक्या बहिणीची चिंता नाही. २४ लाख विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील लाखो बहिणींना सरकार नोकरी देऊ शकत नाही. लाडक्या बहिणींचे पती शेतकरीही आहेत आणि हा शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, असे पटोले म्हणाले.
सोयाबिनला ६ हजार रुपयांचा भाव देणार असे बोलले होते. पण ३ हजारांचा भाव मिळत नाही. धान, कांदा, कापसाची स्थितीही अशीच आहे. भावांतर योजना लागू करून फरक देण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले. सरकार फक्त जनतेला लुटण्यासाठी सत्तेत आले आहे. भाजप युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री कलंकीत आहेत. दररोज महाराष्ट्राची प्रतिमा खराब केली जात आहे. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे दररोज उघड होत असून पुण्यासह इतर जिल्ह्यांतही तीच स्थिती असल्याचे पटोले म्हणाले.
सत्ताधारी पक्षाचे आमदार भ्रष्टाचार झाल्याचे उघड सांगत आहेत. मागील अडीच वर्षांपासून हेच सुरू आहे. शेतकऱ्यांच्या योजनेत ४ टक्के भ्रष्टाचार होतो हे मंत्र्यांनीच सांगितले, असेहीपटोले म्हणाले.
अजित पवार खोटे बोलताहेत
सत्ताधारी पक्षाचा आमदार पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे सांगतोय. कृषिमंत्र्यांनीही भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. पीकविमा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार जर घोटाळा झालाच नाही असे म्हणत असतील, तर ते धादांत खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलू नये, कशासाठी ते खोटे बोलत आहेत असा प्रश्न विचारून अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू व शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या कपाळावरचे कुंकू विसरू नये, असे पटोले म्हणाले.