"जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा; ओबीसी-मराठा वाद हा...", नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

काकाच्या जीवावर जे मोठे झाले, ते आज काकाला शिव्या मारत असतील तर तो...
"जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा; ओबीसी-मराठा वाद हा...", नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

राज्यात सुरु असलेला ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद सरकारनिर्मित आहे. सरकारकडून हा वाद मुद्दाम घडवून जनतेच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम केले जात आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच, काँग्रेसला या वादात पडायचे नाही. राज्यात आणि देशात आज महागाई, बेरोजगारी सारखे ज्वलंत प्रश्न असतांना त्याकडे कोणाचे लक्ष नाही. मुळ मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून सरकारला ते मुद्दे सोडवायला भाग पाडण्याचे काम काँग्रेस करणार आहे, असे पटोले म्हणाले. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे जिल्हा महिला मेळाव्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना पटोले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगर येथील ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात नाभिक समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. छगन भुजबळ सारख्या मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे खऱ्या अर्थाने संविधानिक व्यवस्थेचा अपमान करणारे आहे. नाभिक समाज महत्त्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर, त्याचा आम्ही निषेध करतो. सरकारने देखील या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे. या सरकारने 'जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे', असे म्हणत नाना पटोले यांनी भुजबळांनी केलल्या व्यक्तव्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला.

एकीकडे महागाई, बेरोजगारी आकाशाला भिडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून देशात आणि राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आमदार व खासदारांकडून महिलांवर अत्याचार वाढत आहेत भरदिवसा गोळीबार, गुंडगिरी माजवून सामान्यांना छळले जात आहे, असे ते म्हणाले.

अजित पवार यांनी, "शेवटची निवडणूक आहे असे सांगून भावनिक आवाहन केलं जाईल', कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत?", असे म्हणत बारामती करांना या आवाहनाला बळी न पडण्याचे आवाहन केले होते. यावरही नाना यांनी टीका केली. मोठ्यांचा अपमान करणे, मागासवर्गीयांचा अपमान करणे म्हणजे या जनतेच्या मूळ प्रश्नांना डायव्हर्ट करण्याचे काम सरकार करत असून सत्तेच्या नशेमध्ये असे वक्तव्य हे लोक करतात, असे ते म्हणाले. तसेच, काकाच्या जीवावर जे मोठे झाले, ते आज काकाला शिव्या मारत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याबद्दल अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in