
मुंबई : अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांची कर्ज माफी असे राज्यातील विविध प्रश्न भेडसावत असताना ५७ हजार ५०९ कोटी ७० लाखांच्या पुरवणी मागण्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर करण्यात आल्या. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, त्या २१०० रुपयांचे काय झाले, सत्ताधारी पक्षातील आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा हा खर्च कशासाठी, राज्याचे दिवाळ निघाले, परंतु बहुमताच्या जोरावर पैसा लुटण्याचा धंदा सुरूच राहणार, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पुरवणी मागण्यांवर आक्रमक भूमिका घेतली.
गुहागर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी १० कोटींचा निधी मागितला. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री काहीच बोलले नाही. कोणाला किती निधी द्यायचा हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात, असा हल्लाबोल विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान केला.
पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असून अनेक आमदारांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मतदारसंघात चांगला निधी मिळत होता. मात्र आता सत्ताधारी पक्षातील मंत्री आमदारच निधीसाठी नाराजी व्यक्त करत असल्याचे समोर आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत होता. कदाचित त्यावेळी ते आमच्याबरोबर होते. त्यामुळे अजित पवार आमच्या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी देत होते. पण, दुर्दैवाने नंतरच्या काळात ‘अपने हुए पराये’ किंवा ‘अपनो को किया पराया’ अशी स्थिती झाली आहे. माझ्या मतदारसंघात निधी येणे खूप कमी झाले आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना लगावला.
‘ओयो’ हॉटेलची तपासणी करा!
पावसाळी अधिवेशनात सोमवारी दुपारनंतर तीन तास पुरवणी मागण्यांवर चर्चा होती. यावेळी भाजपचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच ओयो हॉटेलचा मुद्दा उपस्थित करत ओयोओ हॉटेलची चैन आहे. शहरांपासून दूर असणाऱ्या या हॉटेल्समध्ये नेमके काय सुरू असते, हा अभ्यास करण्याचा विषय आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे संस्कृतीचे रक्षक करणारे सरकार असून हॉटेल ओयोची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी यावेळी केली. या हॉटेल्सनी ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाही. या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते, हा एक पोलीस विभागाच्या तपासणीचा भाग आहे. एकूणच ओयो हॉटेलची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली.