मुंबई : लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला जोरदार धक्का दिला आणि ‘मविआ’ला पसंती दिली. स्वयंघोषित विश्वगुरु यांनी राज्यात १७ सभा घेतल्या. मात्र जनतेने महायुतीला नाकारले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत यावे, अशी जनतेची अपेक्षा असून ती आम्ही पूर्ण करणार. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ हाच विधानसभा निवडणुकीत चेहरा असणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर ‘मविआ’च्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’चे सरकार आणण्यावर जोर देण्यात येणार आहे. यासाठी सर्वसमावेशक जाहीरनामा बनवण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ‘मविआ’चे प्रमुख नेते दिल्लीत दाखल असून महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची बैठक बुधवारी मंत्रालयासमोरील शिवालयात पार पडली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.
‘मविआ’च्या काळात चांगले सरकार दिले यांची नोंद देशाने घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत चांगले सरकार देण्याची ‘मविआ’च्या नेत्यांची तयारी असणार आहे. विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे नियोजन करावे, कोणाला उमेदवारी द्यावी, मतदारसंघातील जनतेच्या काय अपेक्षा यावर चर्चा झाल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
१६ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे वडेट्टीवार म्हणाले.