
मुंबई/नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत पुरती पिछेहाट झाली. १०३ जागा लढवलेल्या काँग्रेसला केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागल्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस हायकमांडच्या भेटीसाठी सध्या दिल्लीत असलेल्या पटोलेंनी राजीनामा दिला, अशी चर्चा होती. मात्र आपण कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नाही, अशी स्पष्टोक्ती नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा घेतला, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेसुद्धा हजर होते. नाना पटोले दिल्लीला जाताच महाराष्ट्रातून ते राजीनामा देतील, अशी चर्चा सुरू झाली. मात्र पटोले यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. “मी राजीनामा दिला नाही. ज्येष्ठ नेत्यांसोबत राज्यातल्या निकालाची चर्चा झाली. जनता आमच्यासोबत आहे,” असे पटोले यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राज्यात विधानसभेची निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक मोठे नेते पराभूत झाले. पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक मोठे नेते पराभूत झाले. खुद्द नाना पटोले यांना २०८ मतांनी विजय मिळवता आला. काँग्रेसने सर्वाधिक जागा विदर्भात लढवल्या होत्या, तिथेच काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. बालेकिल्ल्यातच काँग्रेसला अपयश आल्याने पराभवाचे खापर पटोलेंवर फोडण्यात येत आहे.