
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मविआच्या नेत्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महायुतीवर हल्लाबोल केला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजपचे माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरले, असे सांगत ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, ते भाजपचा बाप होऊ शकतात’, असे विधान नाना पटोले यांनी विधानसभेत केल्याने एकच गदारोळ झाला. तसेच नाना पटोले यांनी अध्यक्षांजवळील राजदंडाला स्पर्श केल्याने गोंधळ उडाला. नाना पटोले यांनी असंसदीय शब्दाचा वापर करणे योग्य नाही, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी समज देत नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केल्याचे जाहीर केले.
महायुती सरकारमधील सदस्य बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. हा अपमान आता राज्यातील शेतकरी सहन करणार नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे. मंत्री कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी केलेले ‘शेतकऱ्यांचा बाप मोदी’ हे वक्तव्य अजिबात चालणार नाही. मंत्री कोकाटे आणि लोणीकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत नाना पटोले यांनी जोरदार संताप व्यक्त केला. ‘नाना पटोले तुमच्याकडून असंसदीय भाषेचा वापर होणे हे चुकीचे आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. मला कारवाई करायला भाग पाडू नका, असा इशाराही नार्वेकर यांनी दिला. मात्र, पटोले रागाने विधानसभा अध्यक्षांच्या जवळ गेले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला. यामुळे राहुल नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली.
‘नाना पटोले हे सभागृहाचे अध्यक्ष राहिले आहेत. राजदंडाला हात लावल्यानंतर काय कारवाई केली जाते, याची कल्पना तुम्हाला असेल, मला कारवाई करायला भाग पाडू नका’, असे नार्वेकर म्हणाले. मात्र, नाना पटोले यांनी संताप व्यक्त केल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष म्हणून पटोले यांचे एक दिवसासाठी निलंबन केल्याचे राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले.
बीड लैंगिक अत्याचारप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’
‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर कोचिंग क्लासेसमध्ये लैंगिक अत्याचाराचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी ‘एसआयटी’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.