नाना पटोले यांचा ठाकरे गटाला इशारा ; काँग्रेसच्या लोकांना प्रवेश देणे सुरू आहे ते योग्य नाही

महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले यांचा ठाकरे गटाला इशारा ; काँग्रेसच्या लोकांना प्रवेश देणे सुरू आहे ते योग्य नाही

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या प्रकारे काँग्रेसच्या लोकांना प्रवेश देणे सुरू आहे ते योग्य नाही. आमचे जे उमेदवार त्यांनी पक्षात घेतले आहेत ते परत दया अशी आमची भूमिका असेल अन्यथा त्या जागेवर आमचा दावा असेल अशी रोखठोक भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले हे आज सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभानिहाय चर्चा केली जाईल. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे. या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच राहील. ठाकरे गटाने महाडमध्ये स्नेहल माणिकराव जगताप यांना प्रवेश देण्यात आला आहे त्याबददल विचारले असता. त्यांनी हे केले नाही पाहिजे. त्यांना समजावून सांगण्यात आले आहे. ठाकरे गटाने जे उमेदवार घेतले आहेत ते परत दया अशी आमची भूमिका असेल. नाही तर त्या जागेवर आमचा दावा असेल असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या नाना पटोले यांनी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. विठ्ठल-रुक्मिणी हे गरीब, सर्वसामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी जनतेचे दैवत आहे. बळीराजा आज अस्मानी संकटाने घेरला असून असंवेदनशील खोके सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता विठ्ठलानेच बळीराजाचे अस्मानी, अवकाळी पावसापासून रक्षण करावे, अशी प्रार्थना केल्याचे पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in