Nanded : पाण्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू

सैलाब नगर खडकपुरा भागात पाण्यात बुडून १५ वर्षीय शेख मिनाज साजीद बागवान याचा मृत्यू झाला. मनपाच्या जीवरक्षकांनी मृतदेह पाण्यातून काढून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नांदेड : सैलाब नगर खडकपुरा भागात पाण्यात बुडून १५ वर्षीय शेख मिनाज साजीद बागवान याचा मृत्यू झाला. मनपाच्या जीवरक्षकांनी मृतदेह पाण्यातून काढून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

मराठवाडा भागात मागील ३ दिवसांपासून अतिवृष्टीमुळे भारतीय हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. जालना, परभणी, छत्रपती संभाजी नगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे विष्णूपुरी धरणातील पाण्याची आवक लक्षणीय वाढली आहे.

विष्णुपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडून २,५०,००० क्युसेकच्या प्रवाहाने पाणी नदीत सोडले जात आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ३५१ मीटर ओलांडून सध्या ३५२.०५ मीटर धोका पातळी गाठली आहे. यामुळे मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम. कॉलनी, गाडीपुरा कालापुल परिसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट, मल्ली परिसर, बिलाल नगर, पाकीजा नगर, शंकर नगर, वसरणी यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे.

वसरणीमधील पंचवटीनगर येथील ७२ वर्षीय महालाबाई विठ्ठलराव महात्मे यांना मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच अनिकेत गादेवार यांच्या श्वान फार्मिंग येथून २३ पाळीव प्राणीही बचावले गेले.

बाधित नागरिकांसाठी सहा क्षेत्रीय कार्यालयांत १० तात्पुरती निवारा केंद्रे उभारण्यात आली असून, त्यात एकूण २७४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. येथे पिण्याचे पाणी, जेवण, नाश्ता, ग्रीन मॅट व विद्युत सुविधा उपलब्ध आहेत.

महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाऊ नये, तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत घाबरू न जाता ०२४६२-२६२६२६ किंवा २३०७२१ या अहोरात्र सुरु असलेल्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in