भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

"काँग्रेस पक्षात प्रवेश करताना, पुन्हा माझ्या घरी आल्याची भावना आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो, मात्र आता पुन्हा आपल्याच घरी आलो आहे".
भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
Published on

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल, मात्र त्यापूर्वी पक्षबदलाचे वारे वाहू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार भास्करराव पाटील-खतगावकर यांनी भाजपला राम-राम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील-खतगावकर यांनी दादरस्थित प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय ‘टिळक भवन’ येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

भास्करराव पाटील-खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्षप्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा करण्यात येणार आहे. भास्करराव पाटील-खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी माजी मंत्री डी. पी. सांवत, आमदार मोहनराव हंबर्डे व नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षात प्रवेश करताना, पुन्हा माझ्या घरी आल्याची भावना आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रिपदावर काम करण्याची संधी दिली. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो, मात्र आता पुन्हा आपल्याच घरी आलो आहे. भास्कराव पाटील- खतगावकर.

logo
marathi.freepressjournal.in