
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तामसा (ता. हदगाव) येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाईट नजरेने पाहून अश्लील इशारे केल्याप्रककरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोमवारी घडली असून, तामसा पोलिसांनी विलंब न करता मंगळवारी संशयीत आरोपीला बेड्या ठोकल्या.
सोमवारी पीडित मुलीची आई मोलमजुरीसाठी शेतावर गेली असता घरात आई नसल्याचे पाहून कांतराव शेकदारने दुपारच्या सुमारास मुलीच्या घराभोवती तीन-चार येरझारा मारत मुलीकडे वाईट नजरेने पाहत इशारे करत होता. हा प्रकार मुलीच्या पंधरा वर्षीय भावाच्या लक्षात आल्याने त्याने कांतरावास विचारणा केली असता, शेकदारने त्याला शिवीगाळ केली. हा प्रकार त्याने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने आपल्या नातेवाईकांना घेऊन तामसा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.