
नांदेड : उपवासाच्या काळात मोठ्या प्रमाणावर खाल्ल्या जाणाऱ्या भगरीबाबत नांदेड जिल्हा प्रशासनाने नागरिकांना जागरूकतेचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात भगर या धान्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन अन्न विषबाधा होण्याची शक्यता वाढते. विशेषतः अस्परजिलस या बुरशीमुळे फ्युमिगाक्लेविनसारखे विषारी घटक तयार होतात. यामुळे महाराष्ट्रात तसेच नांदेड जिल्ह्यातही अन्न विषबाधेच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी उपवासात भगर खाण्याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे.
प्रशासनाने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, बाजारातून भगर घेतल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी. शक्यतोवर ब्रँडेड व पॅकबंद भगरच वापरावी. लेबल नसलेली किंवा सूटी भगर टाळावी.
पॅकिंग व ‘बेस्ट बिफोर’ दिनांक तपासावा. भगर स्वच्छ व कोरड्या जागी, झाकण बंद डब्यात साठवावी, जेणेकरून ओलाव्यामुळे बुरशी होणार नाही. जास्त दिवस साठवलेली भगर किंवा भगरचे पीठ वापरणे टाळावे. शक्यतोवर भगरीचे पीठ घरीच आवश्यक तेवढेच दळून वापरावे, कारण पीठात ओलावा शोषण्याची क्षमता अधिक असते आणि त्यामुळे बुरशी होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय, दशम्या किंवा भाकरीऐवजी शिजवलेली भगर खिचडी खाणे अधिक सुरक्षित आहे.
भगर व शेंगदाणे हे प्रथिनयुक्त असल्यामुळे सलग उपवासात अति प्रमाणात सेवन केल्यास ॲॅसिडिटी, उलटी, मळमळ, पोटदुखी यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे पचनशक्तीप्रमाणे हे पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावे.
विक्रेत्यांसाठी प्रशासनाच्या सूचना
विक्रेत्यांसाठीही प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विक्रेत्यांनी फक्त पॅकबंद भगरच विकावी. उत्पादकाचा पत्ता, परवाना क्रमांक, पॅकिंग व वापर दिनांक स्पष्ट असलेले पॅकेटच ठेवावे. मुदतबाह्य किंवा खुली भगर व भगरचे पीठ विकू नये. घाऊक भगर विक्री करताना खरेदी पावती ठेवणे अनिवार्य आहे.