
नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि. १ ते १५ जानेवारी दरम्यान भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अधिक सदस्य भाजपमय बनविण्याचे उद्दिष्टे आहे. त्यामुळे नवीन निवडी झाल्यानंतर आणि सदस्य मोहीम पूर्ण झाल्यानंतर नवीन नांदेड महानगराध्यक्ष ठरविला जाईल, असे भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.
भाजपने विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. त्यानंतर गुरुवारी खा. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच पक्षसंघटनेसंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, तिन्ही पक्षाचे मिळून महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारी करायची आहे. त्या अनुषंगाने भाजप सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. २०४७ पर्यंत भाजपचे संघटन अधिक वाढविणे असून, १८ वर्षांखालील व्यक्तीची नोंदणी केली जाणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन व इतर सुविधेंच्या माध्यमातून नोंदणी केली जाणार आहे. १ ते १५ जानेवारीदरम्यान हे सदस्य नोंदणी अभियान राबविले जाईल. प्रत्येक विधानसभेसाठी ५० हजार अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभेसाठी साडेचार लाख नवीन सदस्य बनविले जातील. राज्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष व इतर निवडी ही सदस्य नोंदणी झाल्यानंतर केली जाणार आहे. त्यामुळे नांदेड शहराचा महानगराध्यक्ष आताच निश्चित होणार नाही. गरज भासल्यास प्रभारी महानगराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमर राजूरकर, देगलुरचे आ. जितेश अंतापूरकर, प्रवीण साले, किशोर देशमुख, चैतन्यबापू देशमुख, मारोतराव कवळे गुरुजी, विजय गंभीरे, नांदेड जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, शितल खांडील आदींची उपस्थिती होती.
स्वामित्व प्रॉपर्टी कागदपत्र शासनस्तरावर मिळणार
तसेच स्वामित्व योजनेसंदर्भात बोलताना प्रॉपर्टीचे कागदपत्र प्रत्येकाला दिले जातील. पारदर्शकपणे प्रॉपर्टी कागदपत्र शासनस्तरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्राथमिक स्तरावर भोकर आणि हदगाव येथील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप केले जाईल. गावपातळीवर बऱ्याचदा प्रॉपर्टीचे कागदपत्र नसल्यामुळे मालकी हक्क मिळणे अवघड जाते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनातून हे प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे, असेही ते म्हणाले.