नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काही गावांवर रविवारी रात्री आभाळच कोसळले होते. ढगफुटी सदृश्य पाऊस, लेंडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि उदगीर भागातून येणारे पाणी यामुळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सहा गावांना पुराच्या पाण्याने वेढली गेली होती. हसनाळमधील पाच व तेलंगणातील चार असे नऊ जण बेपत्ता झाले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत तीन व मंगळवारी (दि.१९) सायंकाळपर्यंत सहा जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले होते. एक जण बेपत्ता असून, शोध कार्य चालू आहे.
हसनाळामध्ये बेपत्ता झालेल्या पाचपैकी भीमाबाई मादाळे, गंगाबाई मादाळे व ललिता भोसले यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळपर्यंत हाती लागला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी पिराजी म्हैसाजी थोटवे, चंद्रकला विठ्ठल शिंदे यांचा मृतदेह हाती लागला. यावेळी नातेवाईकांनी हे सारे प्रशासकीय बेजबाबदारपणाचे बळी असल्याची संतप्त भावना व्यक्त करत आक्रोश केला.
दरम्यान, मुखेड - उदगीर तालुक्याच्या सीमेवरील मौ. धडकनाळ येथील पुलावरून सोमवारी रात्री १.४० वाजता ४ पुरुष, ३ महिला हे १ कार व १ ऑटोसहित वाहून गेले होते. त्यापैकी ३ पुरुषांना स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत वाचविण्यात आले आहे. त्यापैकी १ पुरूष व ३ महिला बेपत्ता होते. पैकी महबूब अहमद साहेब गोंडगावकर (वय ३२) (रा. गोंडगाव, ता. देगलूर), हसीना अब्दुल पाशा शेख (वय ३२, रा. जकैळ, तेलंगाणा) व समीना रशीद शेख (वय ४५ रा. जकैळ, तेलंगाणा) हे तीनही मृतदेह सापडले आहेत. एक जण बेपत्ता आहे. एकुण आठ जणांचा बळी गेला आहे.
रावणगाव येथे अंदाजे २७१, हसनाळमध्ये ३०, भासवाडी ४०, भिंगोली ४५ नागरिक पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलेले होते; त्या सर्व नागरीकांना शोध व बचाव पथकाकडुन सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे.