नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही

बाजारात आवक प्रचंड वाढल्याने झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असा दसरा यंदा अंधारातच गेला.
नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही
नांदेड : दसरा गेला अंधारात, आता दिवाळीचं काय? फुले अक्षरशः फेकली रस्त्यावर; शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघाला नाही 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

भास्कर जामकर

नांदेड : बाजारात आवक प्रचंड वाढल्याने झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळाल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असा दसरा यंदा अंधारातच गेला. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण येत आहे. शेतकऱ्यांसाठी हा सणही काळाच जातो की काय, अशी भयावह परिस्थिती सध्या दिसून येत आहे.

गेली दोन वर्षे दसऱ्याला झेंडूच्या फुलांना ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदाही फुलांना चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी पाणीटंचाई असतानाही मोठ्या प्रमाणावर झेंडूची शेती फुलवली होती. मात्र, बाजारात आवक प्रचंड वाढली आणि फुलांना पडेल भाव मिळाला. काही ठिकाणी १५ ते २० रुपये किलो दरानेही फुले विकावी लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. बाजारात गर्दी असूनही दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गतवर्षी ओल्या दुष्काळाशी शेतकऱ्यांना सामना करावा लागला होता. फुलवलेली झेंडूच्या फुलांची बाग अतिवृष्टीमुळे नष्ट झाली होती. परिणामी, झेंडुच्या फुलांची आवक कमी झाल्याने चांगला भाव मिळाला होता. यंदा शेतकऱ्यांनी मागचा अनुभव घेत फुलशेती फुलवली.

मात्र, यंदा पाणी नसताना टँकरने पाणी घालून फुले जगवली, पण बाजारात २० रुपयालाही ती कोणी घेत नव्हती, अशी व्यथा उमरी, धर्माबाद, बिलोली भागातील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.

तातडीच्या आर्थिक मदतीकडे डोळे

दसऱ्याचा सण निराश करून गेला असला तरी दिवाळीचा सण आनंद देऊन जाईल, अशी आशा झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र हा सणही पदरात काही न टाकता कोरडाच जातो की काय, अशी चिंता वाढवणारी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. कारण, शेती पिकवायची तर पाण्याची उपलब्धता असावी लागते. परंतु, नदी-नाले, विहीरीही कोरड्याठाक असल्याने फळबागा, हातातोंडाशी आलेली पिके आणि भाजीपाला कसा टिकवावा, पिकवावा अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारने अधिक अंत न पाहता तातडिने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरु लागली आहे.

सणासुदीत शेतकऱ्यांच्या पदरी काहीच नाही

‘एल-निनो’मुळे ही शेती कोमेजून जाऊ लागली. परंतु, अशाही परिस्थितीत गतवर्षीसारखा भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी टँकरने, हंड्याने पाणी घालून फुलांची शेती फुलवली होती. मात्र, आनंदाऐवजी दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. शासनाने यंदा कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. पण, प्रत्यक्षात अद्याप सणासुदीमध्ये शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in