नांदेडमध्ये गँगवॉरमधून तिहेरी खून

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील डी-मार्ट परिसरात शनिवारी पहाटे दीड ते दोन वाजताच्या सुमारास दोन गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून भीषण गँगवॉर उसळला. तलवार व खंजीरने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला.
नांदेडमध्ये गँगवॉरमधून तिहेरी खून
नांदेडमध्ये गँगवॉरमधून तिहेरी खूनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील डी-मार्ट परिसरात शनिवारी पहाटे दीड ते दोन वाजताच्या सुमारास दोन गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून भीषण गँगवॉर उसळला. तलवार व खंजीरने झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपीचाही तेथेच खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डी-मार्ट परिसरातील एका चित्रपटगृहात अर्जितसिंग व त्याचे काही मित्र सिनेमा पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी महंमद अरबाज आणि सय्यद अवेज यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. पहाटेच्या सुमारास त्यांनी अर्जितसिंगवर तलवार व खंजीराने सपासप वार करत त्याचा खून केला. या हल्ल्यानंतर अर्जितसिंगच्या मित्रांनीही प्रतिहल्ला करत सय्यद अवेजचा खून केला, तर महंमद अरबाज गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महंमद अरबाज याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, ही घटना अर्जितसिंगच्या भावाला समजताच त्याने रुग्णालयात जाऊन महंमद अरबाजवर पुन्हा हल्ला केला. या हल्ल्यात अरबाजचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून, संपूर्ण घटना सुडाच्या रक्तरंजित नाट्यात परिवर्तित झाली.

या प्रकरणी नांदेड पोलिसांनी दोन्ही टोळ्यांतील अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून, खुनाचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैंजने यांनी भेट देऊन पाहणी केली.

माहितीनुसार, सूत्रांच्या साईलाला टोळी आणि सय्यद अवेज-अरबाज टोळी यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून ही घटना घडली.

logo
marathi.freepressjournal.in