

नांदेड : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळ येथून बहुप्रतिक्षित नांदेड-गोवा विमानसेवा येत्या ३१ मार्चपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर नांदेड-नागपूर विमानसेवा पुन्हा पूर्ववत होणार असून, बंगळुरूसाठी आणखी एका विमानसेवेची भर पडणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देत या नव्या सेवांचे स्वागत केले आहे.
स्टार एअर कंपनीची गोवा (मोपा)-नांदेड-नागपूर ही विमानसेवा मार्च अखेरीला सुरू होणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही सेवा उपलब्ध राहील. या सेवेअंतर्गत गोवा (मोपा) येथून सकाळी ९.३० वाजता उड्डाण करणारे विमान सकाळी १०.५० वाजता नांदेडमध्ये पोहोचेल. त्यानंतर सकाळी ११.२० वाजता नांदेडहून उड्डाण घेऊन दुपारी १२.३० वाजता ते नागपूर येथे उतरेल. नागपूरहूचे विमान दुपारी दीड वाजता नांदेड येथे पोहोचेल.
विकासाला चालना मिळणार
या तीनही सेवा सुरू झाल्यानंतर नांदेडहून मुंबई, पुणे, नागपूर, गाझियाबाद (हिंडन), अहमदाबाद, गोवा, बंगळुरू आणि हैदराबाद या आठ प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. नांदेडच्या विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून उद्योग, पर्यटन, शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्राला निश्चितच याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.