
नांदेड : धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथे कुटुंबासोबत दर्शनासाठी आलेल्या ५ भाविक युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, मयत युवक हे हैदराबाद येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.
धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. यामुळे येथे नेहमीच भाविकांची वर्दळ असते. हैदराबादमधील चिंतल बाजार येथे राहणाऱ्या कुटुंबातील १८ भाविक बासर येथे देवीच्या दर्शनासाठी रविवारी सकाळी आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी हे सर्व गेले होते. परंतु, त्यातील ५ युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते पाण्यात साचून असलेल्या गाळात फसले. यानंतर काही वेळातच या ५ युवकांचा बुडून मृत्यू झाला.
ही माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक, जीव रक्षक दलाचे जवान पाण्यात उतरले. काही वेळाच्या शोधानंतर पथकाने राकेश (१७), विनोद (१८), ऋतिक (१८), मदन (१७) व भरत (१८) या ५ युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी म्हैसा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.