

नांदेड : बनावट जमीन कागदपत्रे तयार करून एकच शेतजमीन अनेक व्यक्तींना वारंवार विकल्याच्या आरोपावरून नांदेड शहर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींनी किमान ३५ जणांची तब्बल ११ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल नागोराव गायकवाड (३८), जखाजी ऊर्फ बंडू धोंडिजी पावडे (४३) आणि अमोल अशोकराव मालेगावकर (४२) अशी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, गायकवाड याने यावर्षी जानेवारीमध्ये तक्रारदार देवेंद्र शर्मा यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर अर्धापूर तालुक्यातील मेंढला खुर्द येथील एका शेतजमिनीच्या मालकीचा दावा करणारी बनावट कागदपत्रे त्यांना दाखवली. त्यानंतर या जमिनीची शर्मांना विक्री करण्याचा व्यवहार ठरवून त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
मात्र, त्याच जमिनीची इतर व्यक्तींनाही विक्री करण्यात आल्याचे शर्मा यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी एकाच मालमत्तेसाठी बनावट कागदपत्रे तयार करून विविध व्यक्तींशी स्वतंत्र विक्री करार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.