राजकीय स्वार्थापोटी पोटच्या मुलीला संपवले; नांदेडमधील खळबळजनक प्रकरणात विद्यमान सरपंचालाही अटक

राजकीय स्वार्था पोटी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीला कालव्यात फेकून देऊन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी सुरुवातीला पित्याला अटक केली होती, त्यानंतर आता मुखेड तालुक्यातील केरूर गावच्या सरपंचालाही ताब्यात घेतले आहे.
राजकीय स्वार्थापोटी पोटच्या मुलीला संपवले; नांदेडमधील खळबळजनक प्रकरणात विद्यमान सरपंचालाही अटक
Published on

नांदेड : राजकारणाने सध्या खूपच खालचा थर गाठला आहे याचा प्रत्यय नांदेडमधील खळबळजनक घटनेने आला आहे. राजकीय स्वार्था पोटी एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीला कालव्यात फेकून देऊन तिची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी सुरुवातीला पित्याला अटक केली होती, त्यानंतर आता मुखेड तालुक्यातील केरूर गावच्या सरपंचालाही ताब्यात घेतले आहे. सरपंच होण्याची ईच्छा या आरोपी पित्याला होती, पण तीन आपत्ये असल्याने आरोपीने जुळ्या असलेल्या दोघांपैकी एका सात वर्षांच्या मुलीची हत्या केली. विशेष म्हणजे विद्यमान सरपंच गणेश शिंदे या आरोपीने हा सल्ला त्याला दिल्याचे तपासात पुढे आल्याची माहिती आहे.

आरोपी पांडुरंग बाबुराव कोंडमंगले (३२) हा मूळ मुखेड तालुक्यातील केरूर येथील रहिवासी आहे. त्याला तीन अपत्ये असून त्यापैकी जुळे आहेत. बाऱ्हाळी नाका येथे त्याचे चहाचे दुकान आहे. आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत त्याची सरपंच होण्याची इच्छा होती, त्याने तशी तयारी देखील सुरु केली होती, मात्र तीन आपत्ये त्याच्यासाठी अडसर ठरत होती. गावातील विद्यमान सरपंच असलेल्या गणेश शिंदे यानेदेखील तुला तीन अपत्ये असल्याने निवडणूक लढता येणार नाही असे वारंवार आरोपीस बजावले. तीन अपत्ये असल्याने आपल्याला निवडणूक लढता येणार नाही या विचाराने अस्वस्थ झालेल्या पांडुरंगने सरपंचाच्या मदतीने एका मुलीला दत्तक देण्याचा विचार केला होता.

मुलीला कालव्यात फेकले

पुढे त्याने तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील एडपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निजामसागर डॅम्पच्या एका कालव्यात जिवंत फेकून दिले. त्यानंतर तो घरी परतला आणि मुलगी हरवल्याचे सांगितले. दरम्यान मुलीचा मृतदेह कॅनॉलमध्ये आढळल्यानंतर एडपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

logo
marathi.freepressjournal.in