भास्कर जामकर/नांदेड
नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणीटंचाईचे संकट घोंघावत असतानाच, जंगलातील वन्यजिवांची अवस्थाही अधिकच बिकट झाली आहे. वन विभागाच्या वतीने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था केली नसल्याने हे प्राणी आता मानवी वस्तीकडे आणि थेट महामार्गावर येत असल्याचे धक्कादायक चित्र दिसू लागले आहे.
नांदेड वन विभागांतर्गत माहूर, किनवट, इस्लापूर, हदगाव या भागात घनदाट जंगल आहे. येथे बिबट्या, अस्वल, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, मोर यांसारखे वन्यजीव मोठ्या प्रमाणात आहेत. नियमानुसार उन्हाळ्यात आणि कमी पावसाच्या काळात वन विभागाने सिमेंटचे कृत्रिम पाणवठे तयार करणे, सोलर पंपावर आधारित पाणवठे भरणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, नैसर्गिक झरे, तळे खोलीकरण करणे या गोष्टी अपेक्षित असतात. मात्र प्रत्यक्षात माहूर-किनवटच्या जंगलात अनेक पाणवठे कोरडे पडले असून, सोलर पंप बंद असल्याच्या तक्रारी आहेत.
पाण्याअभावी बिबटे रस्त्यावर
जून-जुलै महिन्यात अर्धापूर ते तामसा महामार्गावरील वानवाडी घाटात एका मादी बिबट्याने तीन बछड्यांसह रस्त्याच्या खड्ड्यात साचलेले पाणी प्यायल्याची घटना घडली होती. वाहनचालकांनी हा व्हिडिओ काढला होता. भरीस भर जंगलात वन विभागाने कुठेही पाणवठे केलेले नाहीत. त्यामुळे वन्यप्राण्यांचेही हाल होत आहेत, असे स्थानिकांनी म्हटले आहे.
वन्यजीव गणनेतून वास्तव समोर
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन विभागाने पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅप लावून प्राणीगणना केली होती. त्या ठिकाणीच पाणी नसल्याने प्राणी पाणवठ्यावर आलेच नाहीत, असा अहवालात उल्लेख आहे. याशिवाय शेतातील गवत जाळणे, विहिरींना संरक्षण भिंत नसणे यामुळे वन्यजीवांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत.
प्रत्येक बीटमध्ये हवेत २ पक्के पाणवठे
वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांतील पाणीसाठा यंदा ३३ टक्क्यांवर आला आहे, त्याचा परिणाम जंगलातील ओढे-नाल्यांवरही झाला आहे. मर्यादित निधीमुळे सर्व ठिकाणी टँकर पोहोचवणे शक्य होत नाही. परिणामी, पर्यावरणप्रेमींनी मागणी केली आहे की, वन्यजिवांसाठी प्रत्येक बीटमध्ये किमान २ पक्के पाणवठे, सोलर पंप दुरुस्ती आणि दररोज टँकरने पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात यावी.