नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला ‘काचेचा पूल’; सिंधुदुर्ग पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा

वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून हा धबधबा नावारुपाला येईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला ‘काचेचा पूल’; सिंधुदुर्ग पर्यटनाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा
Photo : X (Nitesh Rane)
Published on

राजण चव्हाण/सिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून हा धबधबा नावारुपाला येईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण स्वतःची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही राणे यांनी केले. बारमाही वाहणाऱ्या आणि पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या सुप्रसिद्ध धबधब्यावर ‘सिंधु-रत्न’ योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. विकास आणि देवेंद्र फडणवीस हे एक आगळं-वेगळं समीकरण आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून या पुलाचे उद्घाटन होत आहे, याचा आम्हा सर्वांना निश्चितच आनंद आहे. धबधब्यावरील उर्वरित सोयीसुविधा या नापणे, शेर्पे व नाधवडे गावचे प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, हॉटेल, दिशादर्शक फलक या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील. सद्यस्थितीत आज सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनेच हा पूल उभारण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.

या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, वैभववाडी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे सरपंच लीना पांचाळ, उप-अभियंता विनायक जोशी, ग्रामस्थ, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांचा धनादेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री नितेश राणे यांनी १० लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सुपूर्द केला. फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ, बॅनर किंवा होर्डिंग लावण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री नितेश राणे यांनी ही मदत कक्षाकडे जमा केली.

logo
marathi.freepressjournal.in