लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) बहुमत मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील सहा नवनिर्वाचित खासदारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये भाजप चार, शिवसेना शिंदे गट एक तर आरपीआय आठवले गट एक अशी एकूण सहा खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
नरेंद्र मोदी २.० सरकारमध्ये नारायण राणे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री होते. तर भागवत कराड केंद्रीय अर्थराज्यमंत्री होते. या दोघांनाही सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला होता. मात्र यंदा नरेंद्र मोदी ३.० सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली नाही. यामुळं कोकण आणि मराठवाड्याला यंदाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही.
महाराष्ट्रातील 'हे' ६ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ:
नितीन गडकरी (भाजप)
रक्षा खडसे (भाजप)
मुरलीधर मोहोळ (भाजप)
पियुष गोयल (भाजप)
प्रतापराव जाधव (शिवसेना)
रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-ए)
राष्ट्रवादीला मंत्रिपद नाही...
दरम्यान या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही मंत्री शपथ घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागचं कारण सांगितलं. राष्ट्रवादीला राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार ऑफर करण्यात आलं होतं. मात्र कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्यामुळं राष्ट्रवादीनं हे मंत्रिपद नाकारलं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.