"आमच्यासोबत या, तुमची स्वप्नं पूर्ण होतील..."नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर

आमच्यासोबत या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी खुली ऑफर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिली आहे.
नरेंद्र मोदींची पवारांना ऑफर
नरेंद्र मोदींची पवारांना ऑफरप्रातिनिधिक फोटो

नंदुरबार: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज नंदुरबार येथे पार पडली. छोट्या पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंबंधीच्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तसेच शिवसेना उबाठा गटाला खुली ऑफर दिली आहे. बारामतीच्या निवडणूकीनंतर शरद पवार चिंतेत असल्याचं मोदी म्हणाले, तसेच आमच्यासोबत या तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी खुली ऑफर त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिली आहे. दरम्यान नरेंद्र मोदींच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, “महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते ४०-५० वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणूकीनंतर ते इतके चिंतेत आहेत, की त्यांनी एक वक्तव्य केलं. अनेकांशीचर्चा करूनच ते तसं बोलले असतील. ते हताश आणि निराश झाले आहेत. त्यांना वाटतंय, ४ जूननंतर सार्वजनिक किंवा राजकीय जीवनात टिकून राहायचं असेल, तर छोट्या छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल. याचा अर्थ हा की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं निर्णय घेतलेला आहे.”

“४ जूननंतर काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छाती फुगवून आमच्या अजित दादा किंवा शिंदेंसोबत या. तुमची स्वप्नं थाटात पूर्ण होतील,” असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना जाहीर ऑफर दिली आहे.

शरद पवार यांचं प्रत्युत्तर:

नरेंद्र मोदी यांच्या ऑफरला शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘नरेंद्र मोदी यांच्यामुळं लोकशाही धोक्यात आहे. मोदींना सोरेन आणि केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं. गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला मान्य आहे. हा देश एकसंध ठेवायचाय. त्यासाठी सर्वच धर्मांना सोबत घेऊन पुढं जावं लागेल,’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

जे देशाच्या हिताचं नाही, तिथं मी असणार नाही: शरद पवार

मोदींच्या ऑफरवर बोलताना शरद पवार म्हणाले की, “एका किंवा दोन समाजाच्यासंबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील आणि मोदींची अलीकडची सगळी भाषणं ही समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला पोषक आहेत आणि देशाच्या हितासाठी ते घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही, तिथं मी किंवा माझे सहकारी असणार नाहीत . ”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in