कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान २० मे रोजी होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आले होते. कल्याणमध्ये झालेल्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली. काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण करतं, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच अतिरेक्यांना समर्थन करणाऱ्या काँग्रेससोबत नकली शिवसेनावाले लोक आहेत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही डिवचलं.
मोदींचं उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना ओपन चॅलेंज-
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "काँग्रेसची भाषा नेहमीच तुष्टीकरणाची राहिली आहे. परंतु बाळासाहेबांचं नाव घेणारे काँग्रेससोबत आहेत. काँग्रेस अतिरेक्यांचं समर्थन करते आणि तरीही नकली शिवसेनेचे लोक त्यांच्यासोबत उभे आहेत. काँग्रेसचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात, पण नकली शिवसेनेनं तोंडावर कुलूप आणि डोळ्यांवर पट्टी लावून शांत बसले. काँग्रेसवाले स्वातंत्रवीर सावरकरांचा आपण करतात, पण शिवसेनावाले तेव्हाही काही बोलत नाहीत. माझं त्यांनं आव्हान आहे की, शहजाद्यांच्या (राहुल गांधी) तोंडून वीर सावरकरांच्या महानतेबद्दल पाच वाक्ये बोलवून घ्या. माझं नकली शिवसेनेला आणि नकली राष्ट्रवादीला आव्हान आहे."
काँग्रेसच्या काळात काहीच सुरक्षित नव्हतं...
काँग्रेसच्या काळात देश सुरक्षित नव्हता अशी टीका पंतप्रधानांनी केली. "याआधी सार्वजनिक ठिकाणी काहीच सुरक्षित नव्हतं, काँग्रेसच्या काळात लावारिस वस्तूला हात लावू नका, त्यात बॉम्ब असायचा, अशा घोषणा व्हायच्या. 2014 नंतर अशी घोषणा आपल्याला ऐकायला मिळाली का? बॉम्बस्फोट, दंगली, नक्षली हल्ले रोज व्हायचे. काँग्रेसवाले पाकिस्तानच्या पुढे हात पसरवायचे, प्लीज आमच्यावर हल्ले करू नका. 2014 नंतर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक तुम्ही पाहिले," असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला.
राम मंदिराच्या निमंत्रणाला नकार दिला जातो...
इंडी आघाडीच्या सरकारनं याकुब मेनन यांच्या कबरीला सजवलं पण राम मंदिराच्या निमंत्रणाला नकार दिला जातो. राम मंदिरासाठी नेहमी अपमानजनक भाषेचा वापर केला जातो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमधील सभेतून म्हटलं आहे.