स्थानिक राजकारणावरून हर्षवर्धन पाटील नाराजच! फडणवीसांशी चर्चा, बारामतीत अजित पवारांची गोची

स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी थेट आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीच चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढेही बैठक होईल आणि या बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली जाईल, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
स्थानिक राजकारणावरून हर्षवर्धन पाटील नाराजच! फडणवीसांशी चर्चा, बारामतीत अजित पवारांची गोची

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी मंत्री तथा इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फारसे सख्य नाही. परंतु अजित पवार महायुतीत आल्याने त्यांना युतीचा धर्म पाळावा लागेल, असे बोलले जात आहे. त्यावरून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील, त्यांच्या कन्या संगीता पाटील आणि चिरंजीव राजवर्धन पाटील यांना चर्चेसाठी बोलावले होते. ही चर्चा सकारात्मक झाली. परंतु खरी अडचण स्थानिक प्रश्नांची आहे. सातत्याने सभांमधून आमच्याविरोधात दमदाटी सुरू आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल. परंतु आणखी काही बैठका घेतल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना महायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत जाहीर सभांमधून आम्हाला थेट धमक्या मिळतात, हा विषय अतिशय गंभीर आहे. याच मुद्यावरून आमची फडणवीस यांच्याशी चर्चा झाली, असे सांगितले.

मुळातच महायुतीचा धर्म पाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न राहील, यात शंका नाही. परंतु स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे आम्ही व्यथित आहोत. त्यामुळे ते प्रश्न सुटले पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. जर जाहीर सभांमधून धमकी दिली जात असेल, तर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय कसा राहील. त्यामुळे आपण स्थानिक कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे, याबाबतची माहिती फडणवीस यांना दिली, असे हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

स्थानिक पातळीवरचे जे काही प्रश्न पुढे आले आहेत, त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. पुढील बैठकीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही याबाबत चर्चा झालेली आहे. आज फडणवीस यांच्यासोबतही चर्चा केली. या दोन्ही नेत्यांनी स्थानिक प्रश्नही आपण सोडवू, असे आश्वासन दिले आहे. मात्र, एवढ्या चर्चेने काहीही होणार नाही. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी थेट आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीच चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढेही बैठक होईल आणि या बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली जाईल, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपण योग्य तो मार्ग काढू, असा विश्वास दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिवतारे थोपटेंच्या भेटीला

बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर तालुकाही येतो. पुरंदर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनीही पवारांच्या विरोधात दंड थोपटले आहे. कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांना विजयी होऊ देणार नाही, असा चंग त्यांनी बांधला आहे. त्यातच आज त्यांनी थेट भोरचे कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचे वडील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन आशीर्वाद देण्याची विनंती केली. पवारांनी थोपटे घराण्यालाही सातत्याने विरोधच केलेला आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली. अजित पवार यांच्यावर महायुतीचेच नेते नाराज असल्याने लोकसभेची वाट बिकट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in