मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या 'त्या' विधानाची चर्चा

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विधानानं महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुख्यमंत्रीपदावरून महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या 'त्या' विधानाची चर्चा
Published on

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आपलं लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केलं आहे. परंतु महायुतीतील कुरबुरी सातत्यानं बाहेर येत आहेत. महायुतीतील कोणता घटकपक्ष किती जागा लढवणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच मुख्यमंत्रीपदावरूनही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळं महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विधानानं हा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. निवडणुकीनंतरही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असं नरेश म्हस्के म्हणाले. त्यांच्या या विधानावर भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला आहे. खासदार म्हस्के यांनी संयम बाळगायला हवा, असं दरेकर म्हणाले. मुख्यमंत्री महायुतीचाच होईल, असं विधान काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात केलं होतं. मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न डोक्यातून काढून टाका, असंही फडणवीस म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांच्या विधानाची चर्चा होत आहे.

पुढील निवडणूका मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील

शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, "महायुतीचे नेते यासंदर्भात निर्णय घेतील. वेळोवेळी पुढील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असं जाहीर केलं आहे. परवाच धर्मवीर २ च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुढील १५ वर्ष महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदेच करतील, असे उद्गार काढले आहेत. पुढील निवडणूका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली लढवल्या जातील. निवडणूका जर त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असतील, तर त्या पदावर शिवसेनेचाच दावा असणार आहे."

महायुतीचाच मुख्यमंत्री होईल...

नरेश म्हस्के यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "नरेश म्हस्के हे काही पक्षप्रमुख नाहीत किंवा पक्षांचे प्रमुख नेते नाहीत. महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. कुणीही मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळी वक्तव्य करू नयेत, अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या आहेत. आता नरेश म्हस्के खासदार झालेत, त्यामुळं त्यांनी जबाबदारीनं वक्तव्ये करावीत, जेणेकरून आपल्यात विसंवाद होऊ नये."

logo
marathi.freepressjournal.in